पुणे – राज्यातील शाळांनी स्वत:चे संकेतस्थळ सुरु करणे आवश्यक असून त्यावर सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
शाळेची कार्यपद्धती, शुल्क आकारणी, शुल्क प्रकार, शैक्षणिक तास, शुल्क परतावा व आकारणी पद्धत, पालक शिक्षक संघाची स्थापना आदींची माहिती सहज उपलब्ध व्हावी. शिवाय वर्षभरातील सुट्यांची संख्या, शासनाचे ना-हरकतीचे प्रमाणपत्र, संस्थेचा नोंदणी क्रमांक, संस्थेचे संचालक यांची नावे व पत्ते व दूरध्वनी क्रमांक याची माहिती, शैक्षणिक संस्थेमध्ये असलेल्या सुविधांची माहिती, प्रवेश प्रकीयेची माहिती, शुल्क निश्चितिचा आराखडा संबंधित संस्थेने संकेतस्थळावर द्याव्यात.
ही माहिती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच शाळेने संकेतस्थळ सुरू करणे गरजेचे आहे. याबाबतच्या शासन निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी अमर एकाड यांनी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक यांच्याकडे केली आहे.