आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. या दिनानिमित्त आपण पर्यावरण विषयक जनजागृतीच्या मोहिमा अनेक ठिकाणी राबवत असतो. मात्र कोणत्याही मोठ्या व्यासपीठावर पर्यावरण रक्षणासाठी काय केले पाहिजे, याविषयी अनेक वैज्ञानिक तांत्रिक आणि बऱ्याचदा न समजणारी माहिती शेअर केली जाते. प्रत्यक्षात पर्यावरण रक्षणासाठी आपण स्वतः काय केले पाहिजे, याविषयी बोलले जात नाही. आम्ही येथे अशा टिप्स देत आहोत, जेणेकरून व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण रक्षणासाठी आपण स्वतः काय करू शकतो, त्याची माहिती या निमित्ताने आपल्याला होईल…
घरात असताना मी काय करायला हवे आहे?
1. घरातील कचरा ओला आणि सुका असा वर्गीकरण करुनच टाकेन.
2. घरातील ई-कचरा कोणत्याही अन्य कचऱ्यात मिसळणार नाही.
3. अनावश्यक वीज उपकरणे मी बंद ठेवेन.
4. नळाला येणाऱ्या पाण्याचा मुळीच अपव्यय होऊ देणार नाही.
- कोणत्याही कारणासाठी प्लॅस्टीकची बॅग वापरणार नाही.
- टेलिव्हिजन/होम थिएटरचा आवाज मर्यादेतच ठेवेन.
- घराच्या खिडकीतून बाहेर कचरा टाकणार नाही.
- टॉयलेट/बाथरुमचे ड्रेनेज तुंबणार नाही, याची काळजी घेईन.
घरातून बाहेर पडल्यानंतर मी काय करायला हवे आहे?
1. जवळच्या अंतरावरील कामासाठी चालत किंवा सायकलने जाईन.
2. दूरच्या अंतरासाठीच वाहन वापरेन.
3. दुचाकी शक्यतो इलेक्ट्रीकवरची घ्यायचा प्रयत्न करेन.
4. कार वापरत असेन तर त्याचा वेळेवर मेन्टेनन्स करेन.
- एकापेक्षा किंबहुना दोनपेक्षा जास्त व्यक्तींसाठीच कार वापरेन.
- कारचा एअर कंडीशनर गरज असेल तेव्हाच वापरेन.
- कारमधून कसलाही कचरा रस्त्यावर टाकणार नाही.
- सार्वजनिक ठिकाणी योग्य तेथेच कचरा टाकेन.
ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी काय करायला हवे आहे?
1. अनावश्यक प्रिंट्स काढणे कमी करेन, शक्यतो पाठकोरे कागदही वापरेन.
2. गरज नसलेले पंखे, एअर कंडिशनर, ट्युबलाईट्स बंद करेन.
3. प्रिंटरच्या कारट्रेजमधील कार्बनबाबत काळजी घ्यायला सर्वांना प्रवृत्त करेन.
4. कार्यालयीन कामकाजात मोठ्या आवाजाची उपकरणे वापरणे टाळेन.
- ऑफिसमधील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करताना अनावश्यक पाण्याची नासाडी टाळेन.
- उंच इमारतीत जाताना लिफ्ट तर उतरताना शक्यतो जिन्याचा वापर करेन.
- ऑफिसमधील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागती आहे ना ते पाहीन.
- सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना पर्यावरणविषयक जनजागृतीचे महत्त्व पटवून सांगेन.
समाजात वावरताना मी काय करायला हवे आहे?
1. रहात असलेल्या सोसायटीमध्ये घरगुती कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्टिंग, जल प्रदूषण, वायू प्रदूषण, व्हर्मी कंपोस्टिंग, गांडुळ खत, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर सिस्टीमसाठी आग्रह धरेन.
2. प्रत्येक पावसाळ्यात प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवण्यासाठीच्या मोहिमेत सहभागी होईन.
3. प्रत्येक सहा महिन्यांतून एकदा सोसायटीमध्ये गटागटाने स्वच्छता अभियान, एखाद्या वन क्षेत्रात अथवा अभयारण्यात जाऊन प्लॅस्टीक निर्मूलन मोहिम राबवेन.
4. वृक्षतोड, धूर ओकणारी वाहने अथवा पर्यावरणास हानी पोहोचवणारे कृत्य/घटना निदर्शनास आल्यास त्याची संबंधितांकडे माहिती देईन.
- परिसरातील वनस्पती, पशु-पक्षी त्यांचे जीवनमान याविषयी माहिती करुन घेईन.
- किमान वर्षातून एकदा निसर्ग पर्यटनाला अवश्य जाईन आणि त्या प्रत्येक वेळी निसर्ग जतनाचे धडे घेईन.
- मित्र, नातेवाईक, परिवारातील सदस्यांना पर्यावरण-स्नेही सवयी लावण्यासाठी आग्रही राहीन.
- व्यक्तिगत माझ्याकडून अन्य कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असे कदापीही वागणार नाही.