जुन्नर – शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा गंभीरप्रश्न ऐरणीवर आलेला आहे. गटाने फिरणार्या या कुत्र्यांच्या टोळक्यांचा त्रास वाहन चालक, पायी जा ये करणार्यांना सहन करावा लागत आहे. नागरिकांनी जुन्नर नगरपरिषदेकडे मागणी करूनही तसेच नागरिकांना यामुळे होत असलेला मनस्ताप याची माहिती असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाकडून या प्रश्नाबाबत होणार्या डोळेझाक होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केले आहे.
जुन्नरमधील वर्दीळीच्या बाजार पेठेतील रस्त्यांसह गल्ली बोळातून दिवसरात्र एकमेकांवर भुंकत फिरणारी ही भटकी कुत्री रात्री जोरजोरात भुंकत तसेच विव्हळत राहत असल्याने याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूर्वी केवळ रात्रीच त्रास देणारी ही भटकी कुत्री आता दिवसा देखील आपली दहशत दाखवत आहेत.
दुचाकी व चारचाकीच्या मागे ही कुत्री धावत असल्याने दुचाकी स्वारांना रस्त्यावरून जा-ये करणे जिकरीचे बनले आहे. तर पायी जा-ये करणार्यांवर ही कुत्री भुंकत मागे पळत असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या भटक्या कुत्र्यांमधील काही कुत्री जखमी तर आजारांनी त्रस्त असल्याने संसर्गजन्य आजाराबाबतची भीती आहे. नागरिकांनी या प्रश्नाबाबत तक्रारी करूनही कोणतीही उपाययोजना होत नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालल्याने नागरिक, वाहनचालक वैतागलेले आहेत.
शहरातील काही नागरिक भूतदया दाखवीत या भटक्या कुत्र्यांना बिस्किटे, घरातील राहिलेले शिळे अन्न घालीत असल्याने ही कुत्री रस्त्यावरच घुटमळत राहतात. तर शहरातील चिकन, मटण, मांस विक्रेत्यांचा दुकानाबाहेर ही कुत्री बसून राहतात. त्यांच्या जवळून गेल्यास किंवा दुचाकी घेऊन गेल्यास अचानकपणे ती अंगावर धावून येतात. नगरपरिषदेने हा प्रश्न गांभीर पणाने घेऊन या भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी शहरातील वैतागलेल्या नागरिक , वाहन चालकांनी केलेली आहे.