पुणे – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहर आणि जिल्ह्यातील खासगी शाळांच्या स्वमान्यतेसाठी आता ई-मान्यता संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे स्वमान्यतेसाठीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे शाळांच्या मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा होणारा वेळेचा अपव्यय टळणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या संगणक प्रणालीचे ऑनलाइन कार्यक्रमात उद्घाटन करण्यात आले. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. आतापर्यंत स्वमान्यता प्रस्ताव शाळांच्या मुख्याध्यापकांना किंवा कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्यालयात येऊन सादर करावे लागत होते. त्यानंतर प्रस्तावातील त्रुटी आणि त्या त्रुटींची पूर्तता यात बराच वेळ जातो.
स्वमान्यतेच्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे शाळांची सर्व कागदपत्रे, माहिती, तपासणी अहवाल पालकांना उपलब्ध होणार असल्याने पारदर्शकता येईल. ऑफलाइन प्रक्रियेत जाणारा वेळ बचत होणार आहे. त्यातून अन्य कामासाठी वेळ देता येईल. प्रशासनावरील ताण कमी होऊन कार्यक्षमता वाढेल. ऑनलाइन प्रणालीद्वारे सर्व प्रक्रिया एका ठिकाणी आणण्याचा पथदर्शी प्रयत्न पहिल्यांदा पुणे जिल्हा परिषदेने केला आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद