पुणे – उन्हामुळे पीएमपीला प्रवाशांसह उत्पन्नाचाही फटका

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या शहरामध्ये सुमारे 16 ते 17 हजार दैनंदिन फेऱ्या होतात. तरीदेखील प्रवाशांना थांबण्यासाठी बसस्टॉपवर शेड नसल्याचे चित्र दिसत आहे. या दुरवस्थेचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. याचा परिणाम आर्थिक उत्पन्नावर होत आहे.

शहरामध्ये पीएमपीएलकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सेवा पुरविली जाते. दोन्ही शहरातील सुमारे 307 मार्गांवर पीएमपीएमएलच्या हजारो बसेसच्या फेऱ्या होतात. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील या मार्गांवर सुमारे चार हजार बसथांबे आहेत. त्यापैकी केवळ 1 हजार 382 थांब्यावरच शेड आहेत. यामुळे सुमारे अडीच हजारपेक्षा जास्त बसथांब्यांवर उभे राहणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने, शेड नसलेल्या थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. बस वेळेवर न आल्यास प्रवाशांना वैतागून खासगी वाहनांनी प्रवास करण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहत नाही. परंतु वाढत्या उन्हाळ्यात जाणवणाऱ्या गैरसोयीचा फटका केवळ प्रवाशांनाच नाही तर उत्पन्नाच्या बाबतीत पीएमपीएमएलला देखील सोसावा लागत आहे.

पीएमपीएमएलकडे सुस्थितीतील बसथांबे उभारण्याची मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जात आहे. यासंदर्भात प्रशासनाची विचारणा केली असता, पुणे स्मार्ट सिटीकडे दोन हजार, पिंपरी चिंचवडकडे एक हजार बस शेल्टरची मागणी करण्यात आल्याचे सांगितले. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासंदर्भात काही ठिकाणी काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र ही मागणी वर्षभरापूर्वी देखील करण्यात आली असून याबाबत संबंधित काम सुरू झाल्याने प्रश्‍न जैसे थे असल्याचे दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.