पुणे – ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर मोठे रॅकेट उघडकीस आले. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांंनी केलेल्या तपास आणि चौकशीत ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर हे देखील दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असताना देखील वैद्यकीय शिक्षण विभाग त्यांच्यावर कारवाई करू देत नसल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी सोमवारी केला.
धंगेकर यांनी बोलताना, मी वारंवार ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात जे दाेषी असतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची सातत्याने केली. अनेक डाॅक्टर, कर्मचारी, पाेलीस, कारागृहातील पलीस यांच्यावर याप्रकरणी कारवाई झाली. परंतु ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांनी पंचतारांकित सुविधा आराेपी ललित पाटील याला ससून रुग्णालयात दिल्याचे निष्पन्न हाेऊन देखील त्यांच्यावर अद्याप काेणती कारवाई झाली नाही. डाॅ. ठाकूर यांना अटक केल्यावर यामागील भाजपच्या मंत्र्यांचे नाव मी जाहीर करणार आहे. आत्ता नाव सांगितले तर त्याचा तपासावर परिणाम हाेऊन आणखी फाटे याप्रकरणास फुटतील व ठाकूरला माेकळे साेडले जाईल असे मत धंगेकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना त्यांनी, ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ विक्री करण्यात आली. त्यात आराेपींना अटक देखील करण्यात आली. या प्रकारानंतर डाॅ. ठाकूर यांची भूमिका वेळाेवेळी निष्पन्न झालेली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी असून या शहरात अंमली पदार्थाच्या आहारी तरुणाई जाणे चुकीचे आहे. ललित पाटील पसार झाल्या प्रकरणात पुणे पाेलिसांनी न्यायालयात दाेषाराेपपत्र देखील दाखल केले आहे. डाॅ. ठाकूर यांच्यावरील कारवाई बाबत पुणे पाेलिसांनी वैद्यकीय विभागास लेखी पत्र दिले असून त्यात ठाकूर हे दाेषी असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
मात्र, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतच्या फाईलवर सही करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पुढील कारवाईस पाठवली असल्याची माहिती मला मिळाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत पाठपुरावा घेऊन याेग्य ती कडक कारवाई डाॅ. ठाकूर यांच्यावर करावी अन्यथा नागरिकांचा शासन व व्यवस्थेवरील विश्वास उडेल. अन्यथा मला देखील रस्त्यावर उतरून तीव्र आंदाेेलन करावे लागेल, असेही धंगेकर म्हणाले.