पुणे – महापालिकेच्या आरोग्य प्रमुख पदावर डॉ. भगवान पवार यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडून महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदाची जबाबदारी डॉ. पवार यांच्याकडे देण्यात आल्यानंतर 4 सप्टेंबर 2023 ला त्यांची महापालिकेतून बदली करण्याचे आदेश शासनाने काढले. तसेच त्यांच्याकडे अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या सहाय्यक संचालक पदाचा पदभार देण्यात आला. मात्र, या बदली विरोधात डॉ. पवार यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) आदेशानुसार राज्य सरकारने त्यांची पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखपदी प्रतिनियुक्ती करण्याचे आदेश महापालिकेस दिले आहेत.
महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेत अधिष्ठातांनी दहा लाख रुपये लाच घेण्याचा प्रकार घडला होता. यानंतरच डॉ. पवार यांची अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या सहाय्यक संचालक पदावर बदली केली गेली होती. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेतील लाचखोरीच्या प्रकारामुळे डॉ. पवार यांची बदली झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. या बदलीला डॉ. पवार यांनी मॅटकडे दाद मागितली होती. यासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये मॅटने 19 ऑक्टोबर रोजी डॉ. पवार यांच्या बाजुने निकाल दिला आहे.
महापालिकेला सुनावले..
डॉ. पवार यांच्या बाजूने मॅटने निर्णय दिल्यानंतर, याबाबतचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले होते. त्यानंतरही महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नगरविकास विभागाकडे पत्र पाठवित डॉ. पवार यांना रूजू करून घेण्याबाबत शासनाकडे विचारणा केली. त्यानंतर नगर विकास विभागाच्या उप सचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी डॉ. पवार यांना रुजू करून घेताना मॅटचे आदेश हे स्वयंस्पष्ट असून या बाबत नगरविकास विभागाच्या आदेशाची गरज नाही. महापालिकेने याबाबत अनावश्यक पत्रव्यवहार करून शासनाच्या वेळेचा अपव्यय न करता मॅटच्या आदेशानुसार कारवाई करावी, असे महापालिकेस सुनावले आहे.