बिबवेवाडी – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेची लूट थांबवावी. निवडणुका होत्या म्हणून कुठल्याच वस्तूचे दर वाढविले नाहीत, निवडणुका होताच दरवाढीचा मिटर सुरू झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी यातून धडा घ्यावा. पुन्हा भारतीय जनता पार्टीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही सत्तेत बसवू नका, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये दररोज वाढ होत आहे. ही वाढ थांबावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने सातारा रोड येथे निषेध आंदोलन करण्यात आले. गॅस सिलेंडरची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मुंडन करीत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जगताप बोलत होते.
ते म्हणाले की, गॅस, पेट्रोल, डिझेल यासह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. गेल्या काही महिन्यात निवडणुका असल्यामुळे थांबवलेली दरवाढ आता अचानक केली जात आहे. ही लोकांची फसवणूक आहे. देशातल्या काही बड्या उद्योगपतींचा मात्र यात फायदा होत असून भारतीय जनता पार्टीला आपले हितसंबंधी उद्योगपतींची जपणूक करणे महत्त्वाचे वाटते, यातूनच सामान्य जनतेवर महागाई लादली गेली आहे.
यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख, पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे, कार्याध्यक्ष विपुल म्हैसुरकर, बाळासाहेब अटल, महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी, शशीकांत तापकीर, राहुल पोटे, श्वेता होनराव, अमोल ननावरे, शिवम ईभाड, नामदेव पवार, सायमा शेख, मोसिन काझी, निलेश नवलखा, प्राजक्ता जाधव, सुशांत ढमढेरे, पराग दीक्षित, प्रशांत सास्टे, विजय उभे, संजय दामोदरे, प्रशांत कुदळे, प्रवीण रहाटवडकर, प्रेमराज गदादे, रुपेश आखाडे, सचिन पासलकर, राजू खैरे आदी उपस्थित होते.
महागाईमुळे जनता त्रस्त आहे, केंद्र सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत सत्ता उपभोगत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ रद्द केली पाहिजे या मागणी करीता हे आंदोलन केले. महागाई का वाढली, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. – संतोष नांगरे, अध्यक्ष, पर्वती विधानसभा मतदार संघ