अवसरी खुर्द येथे शिवसैनिकांकडून निषेध ; ग्रामपंचायत कार्यालयात सातत्याने अनुपस्थिती
मंचर – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नेहमीच अनुपस्थित राहणारे ग्रामविकास अधिकारी जे. बी. शिदोरे यांच्या खुर्चीसमोर असलेल्या नामफलकाला पुष्पहार घालून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. 5) निषेध व्यक्त करण्यात आला.
अवसरी खुर्द येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी जे. बी. शिदोरे हे नेहमीच अनुपस्थित असतात, त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होत नाहीत, तसेच ते नागरिकांबरोबर आदबीने वागत नाहीत, लोकांचे फोन उचलत नाहीत, अशा अनेक तक्रारी त्यांच्याबाबत आल्या होत्या. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांनी अवसरी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन त्यांच्या रिकाम्या खुर्चीला आणि समोर असलेल्या नामफलकाला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या बांधकामाची चौकशी व्हावी, कामांमध्ये बेकायदेशीरपणा आणि अनियमितता आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी असल्याने ग्रामविकास अधिकारी यांच्या कार्यालयीन कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने सुरेश भोर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी प्रवीण टेमकर, राजेश टेमकर, सामाजिक कार्यकर्ते विवेक टेमकर, दीपक शिंदे, जालिंदर इंदोरे, गुलाबराव शिंदे, गोविंद इंदोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच गावचे कामकाज केले जाते. याबाबत कोणाची तक्रार नाही आणि कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांच्या शंकेचे निरसन केले जाईल.
– जे. बी. शिदोरे, ग्रामविकास अधिकारी, अवसरी खुर्द