पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महापालिका प्रशासनाच्या वतीने सध्या विविध विकासाभिमुख कामे सुरू आहेत. या कामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मोठा हातभार लागणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये भाजपाचे योगदान आहे. यामुळेच विकसित शहराला अजून “स्मार्ट’ बनविण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी. प्रलंबित विकासकामे मार्गी लावा अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.
चिंचवड विधानसभा मतदार संघासह शहरातील कामांना गती यावी व तसेच नवीन प्रकल्प शहरात साकारले जावेत. यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनामध्ये भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली. या वेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेताना विकासात्मक कामांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी पिंपळे गुरव येथील व्हिलेज प्लाझा हा प्रकल्प, प्रकल्प विभागाच्या वतीने राबविणे, पिंपळे निलख येथील रक्षक चौकात ग्रेड सेपरेटरच्या बरोबरीने भुयारी मार्गाची निर्मिती करणे, वाल्हेकरवाडी डांगे चौकातील पशू संवर्धन येथील जागेपासून डांगे चौकाला जोडणारा पूल तयार करणे, सांगवी फाटा येथे नागरिकांसाठी पादचारी पुलाची निर्मिती करणे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची अद्ययावत इमारत चिंचवड येथील “एम्पायर इस्टेट’ येथे प्रस्तावित करणे, अशी नवी कामे “प्रकल्प विभागा’साठी प्रस्तावित करण्यात आली.
वाकड येथील दत्त मंदिर रस्त्याचे सुरू असलेले काम त्वरीत पूर्ण करणे, पिंपळे गुरव ते दापोडी दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन पुलाची निर्मिती करणे, पिंपळे गुरव- नवी सांगवी सीमेवरील कृष्णा चौक ते एमके हॉटेल विकास आराखड्यातील रस्ता विकसित करणे, “ब’,”ड’, “ह’ क्षेत्रीय कार्यालयातील डीपी व अंतर्गत रस्ते विकसित करणे या संदर्भात देखील निवेदन देण्यात आले आहे.