रस्त्यावर उतरण्याचा चेतन दरेकरांचा इशारा
शिक्रापूर – करंदी (ता. शिरुर) येथील संकल्प इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड कंपनीच्या रस्त्याबाबत प्रशासनाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कंपनी गुजरातमध्ये हलविण्याच्या मार्गावर असल्याचे कंपनी प्रशासनाने जाहीर केल्याने अखेर कंपनी टिकण्यासाठी हवे ते करु तसेच वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरू, असा इशारा माजी उपसरपंच चेतन दरेकर व ग्रामस्थांनी दिला आहे.
करंदी येथील संकल्प इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या कंपनीत पाचशेहून अधिक स्थानिक युवक कायमस्वरूपी नोकरीस आहेत. आजूबाजूच्या अनेकांचे व्यवसाय सुद्धा कंपनीवर अवलंबून आहेत. काही स्थानिकांनी बँकेचे कर्ज काढून खोल्या बांधून कंपनीतील कामगारांना भाडे तत्वावर दिलेल्या आहेत, कंपनीकडून वर्षाला लाखो रुपयांचा कर करंदी ग्रामपंचायतीला दिला जात असल्याने विकासाला देखील चालना मिळत आहे.
कंपनीकडून गावामध्ये अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले जात असल्याने कंपनीचा मोठा फायदा गावाला होत आहे. परंतु कंपनीला रस्त्याची अडचण असून प्रशासन अडचण सोडवण्यास टाळाटाळ व दिरंगाई करीत असल्याने कंपनी गुजरातमध्ये हलविण्याचा विचार कंपनी प्रशासनाने घेतला आहे. कंपनी बाहेर राज्यात गेल्यास गावाला मोठा फटका बसणार असल्याने आता ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याबाबत आपण मुख्यमंत्री, सहकारमंत्री, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करणार असून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू. मात्र, कंपनी हलवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका माजी उपसरपंच चेतन दरेकर यांच्यासह आदी ग्रामस्थांनी घेतली आहे.
आम्ही कंपन्यांच्या पाठीशी
माजी उपसरपंच चेतन दरेकर म्हणाले की, करंदीसह परिसरातील कंपन्यांमुळे युवकांना रोजगार मिळत असल्याने अनेकांचे कुटुंब चालत आहे. मात्र, जाणूनबुजून कोणी कंपन्यांना अडचणीत आणत असेल तर आम्ही कंपन्यांच्या बाजूने कंपन्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे माजी दरेकर यांनी सांगितले.