औंध – सर्वसामान्य पुणेकरांपर्यंत आपल्या पक्षाची भूमिका पोहोचवायची आहे. याकरिता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करून अजित पवार यांचे काम तळागाळापर्यंत पोहोचवायचे आहे, या हेतूनेच पुणे शहरात प्रथमच एवढी मोठी जम्बो कार्यकारणी जाहीर झाली त्याबद्दल समीर चांदेरे यांचे कौतुक केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा मेळावा व पदनियुक्ती सोहळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर व राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ, पुणे येथे पार पडला. यावेळी मानकर बोलत होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “घराणेशाही बाजूला ठेवून जो रस्त्यावर उतरून समाजाचे प्रश्न मांडतो, जो संघटनेला ताकद देतो. त्यांची कदर करत समीर चांदेरे यांनी कार्यकर्त्यांची पारख करून त्यांना संघटनेत कामाची संधी दिली आहे.’
यावेळी शहर उपाध्यक्ष -45, चिटणीस-14, सरचिटणीस-36, संघटक सचिव-16 व विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष म्हणून 9 अशा 120 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, प्रशांत कदम, राज्य प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, दत्ता सागरे, आप्पा रेणुसे, प्रदीप धुमाळ, राकेश कामठे, मनोज पाचपुते, अब्दुल हाफिझ शेख, मनोज बालवडकर, अच्युत लांडगे, प्रिया गदादे, पूजा झोळे, महेश हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“आमचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात संघटनेची बांधणी मजबूत आहे. युवक संघटनेचा यात सिंहाचा वाटा आहे. युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काम करत आहेत.”- समीर चांदेरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस