प्रभाग रचना, आरक्षण विद्यमानांच्याच सोयीचे : इच्छुकांची जोरदार “फिल्डिंग’
नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप जाहीर नाही
विशाल धुमाळ
दौंड – आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रभागातील प्रत्येक पक्षाच्या इच्छुकांनी आपापल्या परीने तिकिटासाठी पक्षाकडे व आघाडीकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत विजय झालेल्या नगरसेवकांसाठी सध्याची प्रभाग रचना व पडलेले आरक्षण सोयीचे असल्याने त्याच-त्याच उमेदवारांना पुन्हा तेथे पक्ष संधी देतील असे शक्यता आहे.
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. राष्ट्रवादीने मागील कार्यकाळात नाराज असलेले नागरी हित संरक्षण मंडळाचे नगरसेवक आपल्याकडे करण्यात सध्यातरी यश मिळवले असल्याचे बोलले जात आहे. आमदार राहुल कुल हे भाजपच्या चिन्हावर आमदार झाले असल्याने व कुल आणि कटरिया शहराच्या राजकारणात एकत्र असल्याने यंदा भाजप, नागरी संरक्षण मंडळ, आरपीआय यांची आघाडी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत कोणते पक्ष कोणाबरोबर युती व आघाडी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मागील पंचवार्षिक कार्यकाळात राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व शिवसेना यांची आघाडी होती तर नागरिक संरक्षण मंडळ आरपीआय, रासप यांची आघाडी होत. नागरिक संरक्षण मंडळाचा नगराध्यक्ष जनतेतून निवडून आला होता. तर भाजप स्वतंत्र लढली होती. दरम्यान, नगराध्यक्षपदाचे आरक्षण अजून जाहीर झालेली नाही हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खरे पत्ते पडण्यास सुरुवात होणार आहे तोपर्यंत फक्त चर्चाच सुरू राहतील.
राष्ट्रवादीला धक्का बसणार
मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्यांनी आमदार राहुल कुल व माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली याचा तपशील बाहेर आला नसला तरी त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
शिवसेनेत दोन गट
यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेते याकडेही लक्ष लागले आहे. शिवसेनेत ही दोन गट पडले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणता गट कोणाकडे जातोय हे पाहणे महत्त्वाचे आहे. तर पक्षाने स्वबळावर लढण्यास सांगितले तर काय होणार हे ही पाहणे महत्त्वाचे आहे.
…की फक्त राजकारण
शहरातील सामाजिक प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत येऊ लागले आहेत व त्यावर आपलाच पक्ष कसा न्याय देऊ शकतो हे सांगण्याचा कसं सोशल मीडिया वापरणारे त्या त्या पक्षाचे व आघाडीचे कार्यकर्ते करीत आहेत मात्र यातून असणारे सामाजिक प्रश्न संपणार का? हा खरा प्रश्न आहे. की फक्त राजकारण होणार हे आगमी काळात स्पष्ट होईल.
शहर विकास आघाडीवर गणिते अवलंबून
शहर विकास आघाडी नावाने आघाडी नंदू पवार यांनी रजिस्टर केली आहे या माध्यमातून शहर विकास आघाडीने शहरातील प्रश्नांबाबत निवेदने दिली आहेत ही शहर विकास आघाडी पॅनल उभा करते की कोणा बरोबर आघाडी करणार यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.