हर्षवर्धन पाटील ः योग्य वेळी निर्णय घेणार
कर्मयोगी पुढील हंगामात 16 लाख टन ऊसगाळप करणार
बिजवडी – बारामती लोकसभा निवडणुकीत उमेदवारी संदर्भात काय चर्चा आहे, हे मला माहित नाही; परंतु योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. पक्ष देईल तो निर्णय मला मान्य असेल, असे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सोमवारी (18 एप्रिल) कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, माझ्यावार होणाऱ्या टिकेचे मी स्वागत करतो. माझ्यावर टीका केल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही, या सगळ्या टीकेला योग्यवेळी समर्पक स्पष्टपणाने उत्तर देईल.
इंदापूर तालुक्यात काही गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. त्या संदर्भात गट विकास अधकिारी यांच्याशी चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पाणी प्रश्नासंदर्भात लक्ष घालणार आहे. तसेच तालुक्यात आजही विजेचा गंभीर आहे.
इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी सभा होत आहेत. त्यामध्ये ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर आरोप व टीका करत आहेत. यावर पत्रकारांनी विचारले असता योग्य वेळी उत्तर देऊ.
ज्यांनी पक्ष सोडला त्यांनाच प्रश्न विचारा
हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर टीका केली. ज्यांना आम्ही समाजामध्ये पदे दिली ती स्वार्थासाठी निघून गेली. त्यामुळे ते पक्ष सोडून का गेले? हे त्यांनाच विचारा.
इंदापूर/बिजवडी – कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या 32व्या ऊस गळीत हंगामामध्ये यशस्वीरित्या 11,12,500 मे. टन गाळप केल्याबद्दल सर्व कामगार बंधू, ऊस वाहतूकदार यांना स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की सर्व सभासद शेतकरी, ऊस वाहतूकदार, कामगारांच्या वतीने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने पुढील हंगामात 16 लाख टन गाळप करण्याचा संकल्प केला आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, सर्वांनी सहकार्य केल्याने विश्वासाने, पारदर्शकपणे आपण 11 लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप केले आहे. पुढील हंगामामध्ये 16 लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी ही कारखानदारी उभी केली असून इंदापूर तालुक्याला वैभव मिळवून दिले आहे.
आज नीरा भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 18 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कर्मयोगी कारखान्याच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या कारखान्याने एकही दिवस क्लिनिंग घेतले नाही. महाराष्ट्राच्या पहिल्या दहा कारखान्यांमध्ये आपला समावेश होण्यासाठी आपणास प्रयत्न करावयाचे आहेत.
कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा म्हणाले, सर्वांचे सहकार्य झाल्याने हे उद्दिष्ट आपण पूर्ण केले. उद्दिष्ट समोर ठेवून कार्य केल्यास यश संपादन करता येईल. अशोक पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. संचालक राहुल जाधव यांनी आभार मानले.