पहिल्या पत्नीची नवर्यासह सवतीला मारहाण
कापूरहोळ – दोन लग्न केलेल्या दोन्ही बायकांची आपसातील भांडणे झाल्यावर पहिल्या पत्नीने भाऊ, भावजय, मामा यांना बोलावून नवर्यासह सवतीला चोप दिल्याची घटना घडली. नवर्याने पहिली पत्नी व तिच्या नातेवाइकांच्या विरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब वैजनाथ शेडगे (वय 23, मूळगाव आंबरगाव, ता. धारूर, जि. बीड; सध्या रा. इंगवली, ता. भोर) यांच्या पहिल्या पत्नीला सीमाला तीन मुले आहेत; मात्र त्याने दोन वर्षांपूर्वी मीनाक्षी सोबत दुसरे लग्न केले.
तिला एक मूल आहे. दोघींचे आपसात पटत नसल्याने दोघींना वेगवेगळे ठेवून नवरा बाबासाहेब सांभाळत होता. सोमवारी (दि. 15) आळंदे (ता. भोर) येथील पोल्ट्री फार्मसमोर दोघींची जोरदार भांडणे झाली. त्यामधून पहिली पत्नी सीमा हिने तिचा भाऊ आकाश सतीश गालफाडे, उमा सतीश गालफाडे,
लक्ष्मी सतीश गालफाडे व मामा अविनाश आलिंदुर कांगळे (सर्व रा. मूळगाव मसाखंडेश्वरी, ता. कळंब, जि. उस्मानाबाद; सध्या रा. वारजे माळवाडी, पुणे) यांना बोलावून घेऊन नवरा बाबासाहेब शेडगे आणि सवत मीनाक्षी हिस लाथाबुक्याने व हातात दगड घेऊन मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शेडगे यांनी चौघांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अधिकचा तपास पोलिस नाईक नाना मदने करीत आहेत.