लोणी काळभोर : मित्रास भेटण्यासाठी निघालेल्या शेतकर्याची गाडी फोडून भररस्त्यात लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरात बुधवारी (दि. 17) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तडीपार गुंडासह दोघांना अटक केली आहे.
राजेश बाळासाहेब काळभोर (वय 31, रा. बाजारमळा, लोणीकाळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अजून दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश काळभोर हे त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी चारचाकी गाडीतून बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास निघाले होते.
बाजारमळ्याकडून लोणी गावाकडे जात असताना ओढ्याच्या अलीकडे अचानक गाडीच्या पाठीमागील काचेवर दगड मारल्याचा आवाज आला. त्यानंतर काळभोर यांनी गाडी थांबविली. त्यांनी गाडीच्या खाली उतरून पाहिले असता, दुचाकीवर दोघेजण दिसले. त्यांच्या पाठीमागुन दुसर्या दुचाकीवरून आणखी दोघेजण आले.
ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे या दोघांनी मिळून राजेश काळभोर यांना पकडले आणि पैसे काढुन दे, नाहीतर तुला खल्लास करुन टाकतो अशी धमकी दिली. काळभोर यांच्या खिशातील ऋषिकेश पवार याने तीन हजार काढुन घेतले त्यांच्या गाडीच्या चारही बाजुच्या काचांवर दगड मारुन त्या फोडल्या. त्यानंतर चौघेजण दोन दुचाकीवरुन पळुन गेले.
आरोपी तडीपार
या गुन्ह्यातील आरोपी ऋषिकेश पवार हा तडीपार गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित आरोपी ऋषिकेश पवार व गौरव सोनवणे यांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अजून दोन अनोळखी आरोपींची नावे समजलेली नाहीत. त्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.