भिगवणमध्ये तुषार क्षीरसागर, जावेद शेख यांच्या पाठपुराव्याला यश
भिगवण : जिओ डिजिटल फायबर लि. या कंपनीकडून फायबर केबल टाकण्याच्या मोबदल्यात भिगवण ग्रामपंचायतला साडेचार लाख रुपये कर स्वरूपात मिळाल्याची माहिती सरपंच दीपिका क्षीरसागर यांनी दिली. ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
याबाबत तुषार क्षीरसागर व जावेद शेख यांनी पाठपुरावा केला होता. मागील महिन्यात जिओ डिजिटल फायबर लि. या कंपनीने भिगवण स्टेशन येथील जिओ मोबाइल टॉवर ते भिगवण राशीन रोड (सुमारे 1500 मीटर) या रस्त्याच्या कडेने भुयारी पद्धतीने फायबर केबल टाकण्याचे काम सुरू केले होते. याबाबत माहिती मिळताच तुषार क्षीरसागर व जावेद शेख यांनी या कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता हे काम ग्रामपंचायतची परवानगी न घेता कर न भरता कंपनीने सुरू केले असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे त्यांनी हे काम तात्काळ थांबविण्याच्या सूचना दिल्या. रीतसर ग्रामपंचायत परवानगी आणि शासकीय नियमानुसार कर भरणा केल्याशिवाय केबल टाकण्याचे काम सुरू करू नये, असे संबंधित कंपनीच्या ठेकेदाराला सांगितले.
त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायत कडे परवानगी साठी अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतने कर मागणीपत्र त्यांना सादर केले व त्यानुसार कंपनीने साडेचार लाख रुपये ग्रामपंचायत खात्यावर वर्ग केल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले. तुषार क्षीरसागर व जावेद शेख यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने ग्रामपंचायतचा फायदा झाला आहे.
सतर्कतेमुळे ग्रामपंचायतचा फायदा
प्रा. तुषार क्षीरसागर व जावेद शेख यांच्या सतर्कतेमुळे ग्रामपंचायतचा फायदा झाला. अन्यथा कंपनीने हे काम कोणालाही माहिती न होता परस्पर पूर्ण केले असते. त्यामुळे ग्रामपंचायतला कर मिळाला नसता.