पळसदेव – पळसदेव भागातील जिल्हा परिषद शाळा शिंदेवस्ती येथील विध्यार्थ्यांनी बीट अंतर्गत होणार्या क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याबद्दल यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. येथील लहान गट खो-खो स्पर्धेत मुले व मुलींच्या संघाने अंतिम सामना जिंकून तालुकास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.
पळसदेव येथील एल. जी. बनसुडे विद्यालय येथे भिगवण बीट पातळीवर यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत बीट पातळीवर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये शिंदेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
या वेळी मुलींच्या संघाने प्रथम सामन्यात भिगवण संघाचा 8-2 ने विजय मिळवला. तर अंतिम सामन्यात डाळज संघाचा 3-1ने पराभव केला आणि तालुकास्तरावर होणार्या स्पर्धेसाठी प्रवेश मिळवला. तर मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात मराडवाडी डाळज संघाचा 7-1 असा विजय मिळवला. विद्यार्थ्यांना शिक्षक राहुल कानगुडे व मुख्याध्यापक उन्मेश कुचेकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक साहित्य पुरवलेबद्दल विशाल बनसुडे यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्या कोमल बनसुडे, विशाल बनसुडे, सुभाष बनसुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप शिंदे, उपाध्यक्षा कविता बनसुडे, धनंजय बनसुडे, जयराम शिंदे, कल्याण बनसुडेसह नागरिक उपस्थित होते.