आमदार दिलीप मोहिते : चुकीच्या पद्धतीने सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न
भामा आसखेड धरणात बोटिंगला परवानगी : चासकमानसाठी प्रयत्न सुरू
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – सत्ता शिवसेनेची आहे मुख्यमंत्री त्यांचा आहे; मात्र ते अजूनही सत्ता राष्ट्रवादीची आहे असे समजून शिवसेनेचे खेड तालुक्यातील काही पदाधिकारी विरोध करीत आहेत. प्रसिद्धी करून चुकीची सहानभूती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच पंचायत समितीच्या इमारती संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन इमारतीचा वाद संपुष्टात आणणार आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते यांनी केले.
खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार सस्नेह बैठकीत पत्रकारांशी तालुक्यातील विविध घडामोडी, प्रश्न आणि विकासाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुक्तसंवाद साधला. ते म्हणाले की, खेड पंचायत समितीची इमारत आहे त्या जागेवर पंचायत समितीची इमारत बांधावी. पुढील सुमारे 60 गुंठे जागेत प्रशासकीय इमारत बांधावी अशी मागणी आहे. आज न्यायालचा विस्तार वाढत आहे. असे असताना त्या शेजारी तहसीलदार, बांधकाम, उपविभागीय पोलीस, संजय गांधी, रजिस्टर कार्यालय आहेत. प्रांत कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे ती इमारत मोडकळीस आली आहे, तेथे खूप गर्दी होत आहे. म्हणून ही सर्व कार्यालये प्रशासकीय इमारतीत एकत्र आणायची आहे. यात श्रेय वाद नाही; मात्र तो अधून-मधून काढला जात आहे. चुकीचे भांडवल करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करीत आहेत. कामे करूनही निवडणुकीत लोकांनी मला घरी बसवले. काम केलेली माणसे निवडून येतातच हा भ्रम जनतेने काढून टाकला आहे काहीजण आता मीच आमदार असे सांगत आहेत.
खेड तालुक्यात पर्यटन क्षेत्र मोठे आहे. बारा ज्योतिर्लिंग असलेले भीमाशंकर खेड तालुक्यात आहे. गुप्त भीमाशंकर, कोटेश्वर, भोरगड हे खेड तालुक्यात आहे. त्यामुळे भीमाशंकर येथे जाण्यासाठी रस्ता नाही ही खंत मनात आहे, त्यामुळे तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळत नाही म्हणून भीमाशंकरला भोरगिरीवरून जाता यावे यासाठी रस्ता करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे, पुढेही ते करत राहणार आहे. भामा आसखेड धरणात बोटिंगला परवानगी मिळवली असून चासकमान धरणातही ती मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार मोहिते यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत द्या
करोनाच्या महामारीत शेतकरी अडचणीत आला आहे. म्हणून बाजार समितीने शेतकऱ्यांना बी-बियाणे बाजार समितीकडून मोफत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पत्रकारांच्यावतीने नंदकुमार मांदळे यांनी केली. तर सभापती विनायक घुमटकर यांनी बाजर समितीचा लेखाजोखा मांडला.
जनतेच्या विकासासाठी करून दाखवणार
तालुक्यात अनेक गोष्टी करायच्या बाकी आहेत. 2014 च्या निवडणुकीत माध्यमांनी झोडझोड झोडले आहे. याची जाणीव आहे. यावेळी निवडणूक लढणार नाही. पुढे राजकारण करणार नाही. भविष्यात काय होईल हे माहित नाही. मात्र, मी आज समाधानी आहे. खेड तालुक्याच्या विकासासाठी खूप काही केले आहे, अजूनही खूप काही करायचे बाकी आहे. ते अगोदर करणार आणि मग सांगणार. श्रेय घेण्यासाठी हे करीत नाही तर तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासाठी ते करून दाखवणार असल्याचा पुनरुच्चार आमदार दिलीप मोहिते यांनी केला. तर यावेळी पत्रकारांची साथ महत्त्वाची आहे. आपण सर्व मिळून तालुक्याच्या विकासासाठी काम काम करू, असे आवाहन त्यांनी केले.