ओझर – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या आसवाणी व इथेनॉल प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहे. येत्या 13 जानेवारीला शरद पवार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली आहे.
या कार्यक्रमानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील असणार आहेत. या कार्यक्रमास खा. डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार दिलीप ढमढेरे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, भाजपनेत्या आशाताई बुचके, शिवसेनेचे (उबाठा )तालुकाप्रमुख माऊली खंडागळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील पहिल्यांदाच एकत्र एका व्यासपीठावर असणार आहेत त्यामुळे हे दोघे या शेतकरी मेळाव्यामध्ये काय बोलणार? याबाबत तालुक्यातील जनतेला उत्सुकता लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार तालुक्यात दुसऱ्यांदा येत आहेत. यापूर्वी दुसऱ्या कार्यक्रमासाठी आले असतानाही त्यांनी सत्यशील शेरकर यांच्याकडे जाणे पसंत केले होते.
सध्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची शरद पवार यांच्याबरोबरची जवळीक वाढत असल्याने या मेळाव्यात शरद पवार नक्की काय बोलणार? जुन्नर विधानसभा निवडणुकीसाठी सत्यशील शेरकर यांची उमेदवार म्हणून घोषणा तर करणार नाहीत ना? अशा अनेक प्रश्नांवर सध्या चर्चा सुरू झाली आहे.