शिरूर तालुक्यात गॅस एजन्सीवरील कारवाई गुंडाळली
सविंदणे – शिरूर शहरातील बड्या गॅसच्या एजन्सीकडून गॅसचा काळाबाजार करून घरगुती गॅसचे कमर्शियल वापरासाठी रिफिलिंग करून आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरातील एजन्सीचे बेकायदेशीर गोडावून नदीच्या पलीकडे अहमदनगर जिल्ह्यात थाटले आहे. येथून बेकायेदशीरपणे सिलिंडर काळाबाजारात जात असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात सुरू आहे. हा व्यवसाय तेजीत असून एजन्सीवरील कारवाई संबंधित विभागाने गुंडाळली का, असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. पुरवठा विभागाची भूमिका गुलदस्त्याच आहे.
शिरूर तालुक्यात शिरूर, न्हावरे, कारेगाव, ढोकसांगवी, सोनेसांगवी, कोरेगाव भीमा, शिक्रापूर भागात घरगुती गॅसचा वापर कमर्शियल टाक्यात रिफिलिंगसाठी होत आहे. कंपनीत तसेच गाडी चालक व कामगारांना 4 किलो टाकीत रिफिलिंगचा राजरोसपणे काळाबाजार सुरू आहे. विशेषत: रांजणगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर पुणे-नगर रस्त्यालगत एका टपरीवर हा रिफिलिंगचा व्यवसाय पोलिसांच्या आर्थिक आशीर्वादामुळे दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू आहे.हा एजन्सीधारक संगणक यंत्रणेच्या प्रणालीत प्रत्येक ग्राहकाला घरगुती गॅसचे वितरण दाखवून या टाक्या काळ्याबाजारात विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मलठण येथे रिफिलिंगसाठी गॅसच्या टाक्यांचा काळाबाजार केल्याने एजन्सीधारकावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे; परंतु पुरवठा विभाग व पोलिसांनी पुढील कारवाई अद्याप केली नाही. 4 किलो गॅस रिफिलिंगसाठी 450 रुपये आकारले जात आहेत. घरगुती गॅसच्या 16.2 किलो गॅसच्या टाकीतून 4 किलो गॅसच्या पाच टाक्या भरल्या जातात. म्हणजेच एकूण घरगुती गॅसच्या टाकीतून 2250 रुपये मिळतात. एका टाकीमागे 1150 रुपये फायदा रिफिलिंगच्या माध्यमातून कमाविला जातो. रिफिलिंग करताना हे लोक कुठलीही काळजी घेत नाहीत. लोकांच्या जीवाशी ते खेळत असून कधीही दुर्घटना घडून मोठी जीवीतहानी होऊ शकते. केवळ आर्थिक तडजोडीमुळे पुरवठा निरीक्षक आणि प्रशासनाचा कुठलाही अंकुश यांच्यावर राहिलेला नाही.
आर्थिक तडजोडीखाली कारवाई म्यान?
टाक्यांचा स्फोट झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत.16.2 किलो गॅसच्या टाकीत 14.2 किलो गॅस भरला जातो. त्यामुळे त्या सुरक्षित असतात. शिरूर तालुक्यातील बेकायदेशीर रिफिलिंग करण्याऱ्यांवर व रिफिलिंगसाठी टाक्या पुरवणाऱ्या एजन्सीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यांच्यावर कारवाई कधी होणार की आर्थिक तडजोडीने कारवाई बासनात गुंडाळणार, याकडे शिरूर तालुक्यातील ग्राहकांचे लक्ष लागून राहिले आहे.