ग्रामीण अजिंक्यपद निवड चाचणीत “ब’ संघ उपविजेता
सासवड – सासवड (ता. पुरंदर) येथे सुरू असलेल्या पुणे जिल्हा ग्रामीण कबड्डी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत महिलांच्या खुल्या गटात तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील राजमाता जिजाऊ “अ’ संघाने अजिंक्यपद पटकावले असून त्यांनी त्यांच्याच “ब’ संघास नमविले आहे. तर तिसरा क्रमांक वाघोली आव्हाळवाडी (ता शिरूर) येथील वाघेश्वरी स्पोर्टस संघाने पटकावला.
ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शोभा भगत, संगिता कोकाटे, चाकणच्या माजी नगराध्यक्षा पूजा चांदेरे आणि पुरंदर पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनीता कोलते यांच्या हस्ते विजेत्या संघाना चषक देऊन गौरविण्यात आले. पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने आणि सासवड येथिल नवतरूण क्रीड मंडळाच्या आयोजनातून सासवड येथील स्व. चंदुकाका जगताप क्रीडा नगरी पालखी मैदान क्रं 2 वर पुणे जिल्हा ग्रामीण अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धा सुरू आहेत.
रविवारी (दि. 8) रात्री खुल्या गटातील महिला संघाचे अंतिम सामने पार पडले. पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पाच दिवस पुणे जिल्हा ग्रामीण भागातील मुले आणि मुली यांच्या किशोर, कुमार व खुल्या गटांत सामने सुरू आहेत. जवळपास 150 संघांनी यात सहभाग घेतला.
याप्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे राष्ट्रीय खेळाडू राजेश ठाकूर, पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सरकार्यवाहक दत्तात्रय झिंजुर्डे, सदस्य किरण चांदेरे, राजेंद्र ढमढेरे, पुरंदर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, नवतरूण क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक मुन्नाशेठ बागवान आदी उपस्थित होते. रवींद्रपंत जगताप यांनी सूत्रसंचलन केले.
आज बक्षीस वितरण
पुणे जिल्हा कबड्डी असोशिएशचे अध्यक्ष आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते आणि भारतीय संरक्षण विभागाच्या दक्षिण कमान पुणे प्रधान निदेशक तथा मुख्य संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पाच दिवस चालणाऱ्या या कबड्डी स्पर्धांचे बक्षीस वितरण मंगळवारी (दि. 10) रात्री 8 वाजता होणार आहे.