पुणे – कमी वीज बिलाचे आमिष दाखवून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करणे, महावितरणचे महसुली नुकसान करणे हे प्रकार बिलिंगमधील तंत्रज्ञानामुळे लपून राहत नाही. असे आढळल्यास मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिला.
पुणे परिमंडलातील सर्व 73 मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापकांची रास्तापेठ येथे आढावा बैठक झाली. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग, संजीव राठोड, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) माधुरी राऊत उपस्थित होते. परिमंडलातील 33 लाख 15 हजार ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग कंत्राटी एजन्सीजद्वारे करण्यात येते. मात्र मीटर रीडिंगचे फोटो अस्पष्ट, फोटो व प्रत्यक्ष रीडिंगमध्ये तफावत, तसेच रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार आढळून येत आहेत.
मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाइल ऍपद्वारे सोपी व वेगवान झालेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. एजन्सीजने नेमलेले मीटर रीडर्स यांच्याकडे मीटरचे फक्त अचूक रीडिंग घेण्याचे काम आहे. मात्र, ते ग्राहकांना वीजबिल कमी करून देण्याचे आमिष दाखवतात. यातून फसवणूक होत आहे. दरम्यान, अशा प्रकरणांत पाच जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.