अध्यक्ष दिनेश ओसवाल : बँकेने ‘एक क्रांतिकारी परिवर्तन ‘ संकल्पना राबवली
राजगुरुनगर – राजगुरुनगर सहकारी बँकेने ‘एक क्रांतिकारी परिवर्तन ‘ ही संकल्पना राबवून सन २०२४ या वर्षाची दिनदर्शिका तयार केली आहे. ही दिनदर्शिका सभासद, नागरिकांना सर्वार्थाने मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी व्यक्त केला.
राजगुरूनगर सहकारी बँकेच्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन शनिवारी (दि. ३०) बँकेच्या बाजारपेठ मुख्य कार्यालयात अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे व संचालक सभासद आणि बँकेच्या ग्राहकांच्या उपस्थितीत झाले, यावेळी अध्यक्ष दिनेश ओसवाल बोलत होते. यावेळी संचालक राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, अरुण थिगळे, अश्विनी पाचारणे, राजेंद्र वाळुंज, दीपक वारुळे, महेश शेवकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र राक्षे, जगन्नाथ राक्षे, बँकेचे अधिकारी अधिकारी सम्राट सुपेकर, दिलीप मलघे, ॲड गायत्री बेरी, अमृत टाकळकर, अंकुश कोहिनकर यांसह बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सभासद, ग्राहक , नागरिक उपस्थित होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल म्हणाले, विज्ञान हे जगाच्या उत्क्रांतीचे, विकासाचे मूळ आहे. अनादी काळापासून चालत आलेल्या पारंपरिक साधन, सामग्रीत विज्ञानाने आमूलाग्र बदल घडवून आणले. त्याची माहिती, इतिहास आजच्या युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना सहज आकलन होण्यासाठी राजगुरुनगर सहकारी बँकेने ‘एक क्रांतिकारी परिवर्तन’ संकल्पना राबवून २०२४ या वर्षाची दिनदर्शिका तयार केली आहे.
या संकल्पनेवर आधारित बारा महिन्यांच्या पानांवर वरच्या दर्शनी भागात माहिती, शोध इतिहास सचित्र छापण्यात आला आहे. पूर्वीच्या उपयुक्त शोधांमधील आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लागलेले नवीन शोध, त्याचे शास्त्रज्ञ, संशोधकांसह संकल्प चित्र असल्याने अभ्यास दृष्टीने ही माहिती सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरणारी अशी आहे. बँकेच्या १७ शाखा असून या प्रत्येक शाखेचा वर्धापनदिन, बँकेचे संस्थापक यांच्यासह थोर पुरुष, महिला यांचा जयंती, पुण्यतिथी बाबत माहिती देण्यात आली आहे.