पुणे जिल्हा : ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्‍यात

इंदापूर तालुक्‍यात मका, ज्वारी, फळभाज्यांवर परिणाम ः फवारणी करता करता शेतकरी मेटाकुटीला
रेडा (प्रतिनिधी) –
इंदापूर तालुक्‍यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊ लागले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके वाया जाऊ लागली आहेत. तर याच पिकांवर फवारणी करण्यासाठी, शेतकरी उसनवारी करुन खर्च भागवू लागला आहे. मात्र या पिकांतून खरे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातात येणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

इंदापूर तालुक्‍यामध्ये शेतकऱ्यांनी मका, ज्वारी, कडवळ, तूर तसेच भाजीपाला पिके घेतली आहेत. ढगाळ हवामानामुळे पिकांवर प्रचंड प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव होत आहे. कीड, रोग घालवण्यासाठी शेतकरी आतोनात मेहनत घेत आहेत. वारंवार औषधांच्या दुकानात चकरा मारत आहेत. तर काही शेतकरी पिकांची पाने औषध विक्रेत्यांना दाखवून औषधे फवारणी करण्यासाठी खरेदी करत आहेत.खरीप हंगामात काढणीसाठी आलेली पिके, पावसाने खराब झाली. यातून मिळणारे उत्पादन मातीमोल झाले आहे.खऱ्या अर्थाने खरीप हंगामात झालेले नुकसान भरून निघावे यासाठी, शेतकरी रब्बी हंगामाच्या माध्यमातून प्रयत्न करत होता. ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

रब्बी हंगामातील गहू, तूर, हरभरा पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे ही पिके हातात लागणार की वाया जाणार या चिंतेत शेतकरी सापडला आहे. या पिकांचे मिळणारे उत्पादन किती मिळणार? किती घट होणार? हे प्रमाण न समजणारे आहे. हाच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी पाठीवर पंप घेऊन शेतात फवारणी करत आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर नक्‍की होणार आहे. तूर पिकांच्या शेंगावर असलेला किडा, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, गहू, मका पिकांवर मर रोगाने घातलेले थैमान, हरभरा पिकावर मावा रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. इंदापूर तालुक्‍यातील काटी, वडापुरी, बावडा परिसरात शेतकऱ्यांनी केलेले मका पीक यावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे.

ढगाळ हवामानामुळे तुरीच्या शेंगा काळया पडू लागल्या आहेत. तर नरसिंहपूर, निमगाव केतकी परिसरामध्ये गव्हावर खोडमाशी अतिक्रमण करीत आहे. हरभऱ्याच्या पिकावर अळी पडत असल्यामुळे या अळीच्या तावडीतून हरभरा शेतकऱ्यांच्या घरापर्यंत कसा पोहोचणार अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे खरीप पिकाबरोबर रब्बी हंगाम वाया जातो की काय, असे संकट शेतकऱ्यांपुढे उभे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.