पुणे जिल्हा: बटाट्याचे क्षेत्र आंबेगावात वाढणार

लागवडीसाठी वातावरण अनुकूल - सभापती निकम यांची माहिती

लाखणगाव-आंबेगाव तालुक्‍यात यावर्षी कांदा रोपांच्या टंचाईमुळे बटाटा लागवड अधिक होण्याची शक्‍यता आहे. पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने थंडीही जास्त दिवस राहणार आहे. त्यामुळे बटाटा लागवड जास्त प्रमाणात होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

बटाटा वाण प्रतवारीनुसार पुखराज पंजाब वाण 80 ते 85 रुपये, गुजरात पुखराज 39 ते 40 रुपये प्रति किलो या दराने मंचर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. अशी माहिती मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

सध्या रब्बी हंगामातील बटाटा पिकांची लागवड सुरु झाली असून मंचर बाजार समितीतून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बटाट्याचे वाण खरेदी केले जातात. सध्या पंजाबवरुन मंचर बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या चांगल्या दर्जाच्या बटाटा वाणाला 80 ते 85 रुपये प्रति किलो असा दर आहे. तर गुजरात आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या वाणाला प्रतवारीनुसार 39 ते 40 रुपये किलो असा दर आहे.

बटाटा वाणाची कमतरता
यावर्षी बटाटा वाणाची कमतरता असल्याने तुटवडा जाणवत आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतून बटाट्याचे वाण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदी करुन लागवडीसाठी नेले जातात. सध्या बटाटा वाणांची कमतरता आहे. पंजाब येथून येणारे बटाटा वाण कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. तसेच गुजरात आणि इतर ठिकाणावरुन येणारे बटाटा वाण उपलब्ध आहेत. मात्र शेतकऱ्यांची पसंती पंजाबवरुन येणाऱ्या वाणाला असते.

कांदा रोपांचा तुटवडा असल्याने…
सध्या कांदा रोपांचा तुटवडा निर्माण झाल्याने बटाटा लागवडीत वाढ होणार आहे. बटाटा लागवडीसाठी मोठ्‌या प्रमाणात भांडवली खर्च येत असतो. बटाटा वाण, खते औषधे यांच्या महागाईमुळे बटाटा लागवड महाग होत असते. परंतु कांदा रोपांच्या तुटवड्‌यामुळे जास्त भांडवली खर्च करुन शेतकरी बटाटा लागवड करण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

अजूनही एक ते दीड महिना बटाटा लागवडी सुरु राहण्याची शक्‍यता आहे. भातखाचरे मोकळी होऊ लागली आहेत. या भाताच्या शेतीमध्ये बटाट्याची लागवड केली जाते. तसेच मराठवाडा विदर्भातील कापूस काढणीस यावर्षी उशीर झाल्याने कापूस काढणीनंतर तेथेही बटाट्याची लागवड केली जाते. ऊस तुटून गेलेल्या क्षेत्रातही बटाट्याची लागवड केली जाते. त्यामुळे सध्या बटाटा लागवड एक ते दीड महिना सुरु राहील.
-संजय मोरे, बटाटा वाणाचे व्यापारी मंचर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.