पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रविवारी (दि.३) होत आहे. या नूतन इमारतीमुळे जिह्यातील सव्वा लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही कामासाठी पुणे विद्यापीठात यावे लागणार नसून, त्यांना सर्व कागदपत्रे उपकेंद्रातून प्राप्त होणार आहे.
नगरमध्ये १८,००० स्के. फु. जागेवर बांधण्या आलेल्या नूतन इमारतीत विद्यार्थी सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता विविध शैक्षणिक कामासाठी पुणे कॅम्पसमध्ये येण्याची गरज नाही. या कक्षामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, विविध प्रमाणपत्रांचे अर्ज स्वीकारणे, परीक्षेच्या निकाल पत्रातील दुरूस्ती संदर्भात अर्ज स्वीकारणे, सुधारीत निकाल पत्र देणे तसेच विद्यापीठात असणाऱ्या विविध शैक्षणिक कोर्सेसची माहिती या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी सॉफ्ट स्कील्स सारखे प्रशिक्षणाचे कार्यक्रमही याठिकाणी राबविण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहमदनगर उपकेंद्र व उच्च तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांचेतर्फे १००० विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन प्लेसमेंट करणार आहेत. यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.
अहमदनगर येथील बाबुर्डी घुमट येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरू डाॅ. सुरेश गोसावी, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्र – कुलगुरू डाॅ. पराग काळकर, आमदार संग्राम जगताप, नीलेश लंके, प्रभारी कुलसचिव डाॅ. विजय खरे, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी आदी उपस्थित राहणार आहेत.