कांदळीत आमदार बेनकेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
नारायणगाव – रयतेचे राज्य कसे असावे याचे विचार श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी आमच्यामध्ये रुजवले आहेत. त्याच पद्धतीचे राज्य पुढील काळात आम्ही करणार आहोत. 2024 च्या निवडणुकीत तरुणांना संधी असून आपल्याला आपल्या विचारांचे सरकार बनवायचे आहे, असे मत कर्जतचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळी येथील औद्योगिक वसाहतीत विविध उपक्रमांसोबतच वृक्षारोपण करण्यात आले, त्यावेळी आमदार पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार अतुल बेनके, बेनके यांच्या मातोश्री राजश्री बेनके, भाऊ डॉ. अमोल बेनके, अमित बेनके, सहायक वनसंरक्षक अमित भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काळे, पांडुरंग पवार, देवराम लांडे, मोहित ढमाले, किशोर दांगट, सरपंच विक्रम भोर, तान्हाजी बेनके, गणपत फुलवडे, अनिल मेहेर, सुरज वाजगे, रोहिदास केदारी, अनघा घोडके उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले की, मी दूरचा विचार करूनच राजकारणात उतरलो असल्याने माझ्यासोबत आमदार अतुल बेनके यांना सोबत घेऊन जाणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जशी 5 हजार 555 झाडांच्या वृक्षांची लागवड करण्यात आली त्याच पद्धतीने येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 55 हजार 555 मतांनी निवडून आणायचा निर्धार आपण सर्वांनी करावा असे आवाहन उपस्थितांना त्यांनी केले.
माजी आमदार वल्लभ बेनके यांनी जो पाया रचला आहे, त्यांचेच आचार विचार पुढे घेऊन जाणार आहे.
– अतुल बेनके, आमदार