वडापुरी – पुणे ग्रामीण पोलीस दल बारामती विभाग यांच्या निर्भया पथकाने इंदापूर तालुक्यातील अवसरी येथील श्री हनुमान विद्यालय अवसरी येथे मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध विषयांवर निर्भया पथक, भरोसा सेल व महिला समुपदेशन कक्ष विभागाच्या प्रमुख हवालदार अमृता प्रवीण भोईटे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी वयात येणाऱ्या मुलींनी घ्यावयाची काळजी, चांगला वाईट स्पर्श, पोक्सो कायदा, स्वसंरक्षण, कायदेविषयक माहिती, पोलीस स्टेशनला दाखल होणारे गुन्हे, निर्भया पथकाचे ध्येय, उद्दिष्ट, तक्रार कोठे व कशी द्यावी याची सविस्तर माहिती दिली. शाळेमध्ये येताना जाताना समूहाने या समूहाने जावा. पोलीस, आई वडील, शिक्षक आपले संरक्षण करतात; परंतु प्रत्यक्ष वेळ येते त्यावेळी आपण एकटे असतो त्यामुळे आपल्या सुरक्षिततेची आपण काळजी घ्यावी.
मुलांनी आई-वडिलांपासून काहीही लपवू नका. मुलींच्या मनामनापर्यंत पोहोचणे व त्यांना बोलते करणे हा निर्भया पथकाचा उद्देश असून अन्याय सहन करू नका. टिंगल टवाळी करुन छेडछाड केली जाते, अशा जर काही घटना घडल्या तर महिला व मुलींनी सतर्क राहून तात्काळ डायल 112 व 1019 किंवा 9689490490 या हेल्पलाइनवर फोन करून माहिती द्यावी.
आम्ही आपणास ताबडतोब मदत करू, मुलींची व महिलांची सुरक्षितता व छेडछाडीस प्रतिबंध करणे हे निर्भया पथकाचे मुख्य उद्दिष्ट असून ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत. तरी छेडछाडीचे प्रकार सहन करू नका तक्रार द्या. कोणालाही घाबरण्याची गरज नाही. निर्भया पथक मुलींच्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहोत, असे यावेळी मार्गदर्शन करताना हवालदार अमृता भोईटे यांनी सांगितले.
यावेळी बारामती अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमृता भोईटे निर्भया पथक, भरोसा सेल, महिला समुपदेशन कक्ष अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती, पोलिस शिपाई सुनील धगाटे, मयूर गायकवाड, मोहिनी ढमे, ज्योती जाधव, तसेच संस्थेच्या सचिव विजया शिंगटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रविण लोंढे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.