पौडसह काही गावांचा पाणीपुरवठा बंद
पौड – पौड आणि परिसरातील काही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुळशी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन जामगांव – दिसली याठिकाणी पुन्हा फुटली आहे. मुळशी प्रादेशिकचा सतत काही ना काही कारणाने खंडीत होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक मात्र वैतागले आहेत.
मुळशी प्रादेशिकहून पौड, कोंढावळे, आंदेशे तसेच जवळील काही गावात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन तीन दिवसांपूर्वी फुटली आहे. यामुळे या तीनही गावातील नागरिक पाणी नसल्याने अडचणीत आलेले आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात वीजबील थकल्याने मुळशी प्रादेशिकचा वीजपुरवठा महावितरणने खंडीत केला होता.
तेव्हाही सहा ते सात दिवस पाणी बंद होते. तर जून महिन्यात माले येथे पाइपलाइन फुटल्याने आठवडाभर पाणीपुरवठा बंद होता. आता जामगांव दिसली येथे पाइपलाइन पुन्हा फुटल्याने पौड, कोंढावळे, आंदेशे व इतर काही गावांचे पाणी बंद झाले आहे.
या गावातील मुळशी प्रादेशिकचेच पाणी पिण्यासाठी मुख्य स्त्रोत असल्याने नागरिकांना पाणी संपल्यानंतर जारचे पाणी विकत घेऊन पिण्यासाठी वापरावे लागते. तर वापरण्यासाठीच्या पाण्यासाठी नागरिकांना इतरञ शोधाशोध करावी लागते. पुढील किती दिवसांत या फुटलेल्या पाइपलाइनची दुरूस्ती होईल हे सांगणे कठीण असून लवकरात लवकर पाईपची दुरूस्ती करून पाणी द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.
पौड येथे मुळा नदीवरून दुसऱ्या पाईपमधून पाणी घेऊन ते टाकीत सोडून गावात सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. हे पाणी फक्त नागरिकांना वापरण्यासाठी असून त्यांचा वापर पिण्यासाठी करू नये.
– प्रमोद शेलार, सरपंच पौड