पिंपरी – बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या चक्रीवादळामुळे पिंपरी चिंचवड, पुण्यात पावसाची शक्यता असून पुढील चार दिवस आकाश मुख्यतः ढगाळ आणि सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. तर, दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर, रविवारी (दि. 26) काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारपासून ढगाळ वातावरण आहे. तर, शुक्रवारी (दि. 24) दुपारी 11.30 नंतर सूर्यदर्शन झाले. तसेच दिवसभर ढगाळ हवामान असले तरी, हवेत काही प्रमाणात गारवा होता. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पिंपरी चिंचवडसह राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वादळी पावसासह गारपीठीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारपासून पावसाचा जोर दिसणार आहे. पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांशी संयोग होऊन 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान काही ठिकाणी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.