कात्रज – मुलांसाठी खेळाच्या मैदानाचे आरक्षण रद्द करून ते मैदान कात्रज दूध डेअरीला देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घातला आहे. नागरिक व माजी लोकप्रतिनिधीचा विरोध असतानाही तो न जुमानता आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाला पाठवण्यात येणार आहे.
या विरोधात मनसे नेते व माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी आंदोलन केले.आरक्षण बदलाला विरोध दर्शवण्यासाठी कात्रज डेअरीच्या खेळाच्या मैदानाला मानवी साखळी करण्यात आली. मैदान आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.., मैदानाची मलई खातंय कोण, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
कात्रज सर्वे नं. १३२ (पार्ट) व १३३ (पार्ट), कात्रज डेअरी शेजारी असणाऱ्या एमपीजी १ क्षेत्र ३.५९१ हेक्टर आरक्षण क्रिडांगणासाठी आहे. ते रद्द करुन ही जागा कात्रज दूध डेअरी व प्रकल्पाकरिता आरक्षित करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. हे आरक्षण पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित यांना समुचित प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यासाठी नागरिकांकडून हरकती मागवण्यात आल्या आहेत. आरक्षण जर उठले तर आपल्या मुलांनी खेळायचे कुठं ? असा सवाल माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी उपस्थित केला. तसेच, खेळाचे मैदान वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे येणाचे आवाहन केले.