लोणी धामणी – काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी प्रचिती मांदळेवाडी (ता. आंबेगाव) येथील ग्रामस्थांनी अनुभवली. वडगावपीर मांदळेवाडी मार्गे कान्हूर मेसाईला पीव्हीसी पाइप घेऊन ट्रक चालला होता. मांदळेवाडी येथे ढगेवाडी-पालेकरवस्ती फाटयावरील वळणावर महावितरणच्या तारांना ट्रकचे कॅबिन लागले व ट्रकने विद्युततारा आढून नेल्या त्यामुळे दोन्ही विद्यूत खांबांना जोराचा झटका बसला आणि दोन्ही खांब वाकले व तारा तुटल्या त्यावेळी विद्युततारांमधून विद्यूत प्रवाह सुरू होता.
तारा तुटल्या त्यावेळी सुदैवाने आसपास कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच कोंडीभाऊ आदक, पोलीस पाटील काळूराम पालेकर पाटील हे घटनास्थळी आले व तात्काळ लोणी येथील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. महावितरणचे कर्मचारी योगेश वाळुंज, कृष्णा भागवत, प्रशांत हिंगे हे घटनास्थळी धावले आणि विद्यूत प्रवाह बंद केला.
मांदळेवाडी (ता. आंबेगाव) : येथे ट्रकने तारा तोडल्यामुळे वाकलेला विद्यूत खांब.