मंचर – मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली लालपरी पूर्ण क्षमतेने रस्त्यावर धावू लागल्याने मंचर बस स्थानक पुन्हा एकदा गजबजले. मार्च महिन्यात राज्यातील एसटी महामंडळाच्या बस करोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर परराज्यातील कामगारांना सोडण्यासाठी एसटीचा वापर करण्यात आला. याव्यतिरिक्त मालवाहतुकीसाठी काही बस वापरण्यात आल्या; परंतु बाकीच्या एसटी बस बंद होत्या. परिणामी त्याचा फटका एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नाला बसला. मागील सहा महिन्यांत राज्य परिवहन महामंडळ तोट्यात गेले आहे.
राज्य आणि देशातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून, करोना रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे योग्य ते खबरदारीचे उपाय योजून एसटी महामंडळाने तसेच सरकारने पुन्हा एकदा एसटीच्या काही बस सुरू केल्या असून बसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद कमी असला तरी प्रवास करताना आता प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. मंचर बस स्थानकावर पुन्हा एकदा गर्दी जाणू लागली आहे.
सध्या योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करून एसटी बसचा प्रवास सुरू केला आहे. परिवहन मंत्र्यांच्या आदेशानुसार एसटी बसमध्ये आसन क्षमतेनुसार पहिल्याप्रमाणे प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. करोनाच्या काळात सुरक्षिततेसाठी एसटी बसमध्ये फक्त 21 प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा होती. आता 42 प्रवाशांना बसमध्ये प्रवास करता येणार आहे,
– रमेश हांडे, आगर प्रमुख, राजगुरूनगर एसटी आगार