पिंपरीत सेरो सर्व्हेची प्रतीक्षा!

Madhuvan

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये करोनाबाधितांची संख्या 67 हजारांवर पोहोचली आहे. करोना संक्रमण होऊन गेलेल्यांची तसेच करोना लढ्यासाठीच्या “अँटिबॉडीज’ शरीरात असल्याची ओळख देणारा सिरोलॉजिकल सर्व्हे पुणे शहरामध्ये झाला आहे. मात्र, शेजारीच असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रुग्णसंख्या एवढी वाढली असतानाही शहरामध्ये अद्याप हे सर्वेक्षण झाले नाही. याबाबत सत्ताधारी पक्षासह प्रशासनालाही गांभीर्य नसल्याचे समोर आले आहे.

आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांनी हे सर्वेक्षण करण्याचे आदेश 10 ऑगस्टला दिले आहेत. सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रामध्ये 67 हजारांवर करोनाबाधित आहेत. दरदिवशी हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होते. तर मृतांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अँटिबॉडीज किती नागरिकांच्या शरीरात तयार आहेत, याचा कुठलाही डेटा महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. 

करोना झाला म्हणजे फक्त ताप, सर्दी खोकला नाही, तर सद्यस्थितीत सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरामध्ये किती लोकांना करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे, हे समजण्यासाठी सेरो सर्व्हे करणे आवश्‍यक आहे. जी शहरे करोनाचा हॉटस्पॉट आहेत, तिथे सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकार तसेच आरोग्य विभाग सकारात्मक आहे. मात्र, महापालिका स्तरावर यासाठी कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे समोर आले आहे.

संसर्ग झाल्यानंतरच्या 15 दिवसांनंतर या आजाराच्या आयजीएम व आयजी ऍन्टिबॉडीज संबंधित व्यक्तीच्या शरीरात तयार होतात. संसर्गातून बरे झाल्यानंतरही बरेच महिने त्या टिकू शकतात. 

या चाचण्या करून एसएआरएस – सीओव्ही2 चा संसर्ग होऊन गेलेल्या तसेच लक्षणे नसलेल्या व्यक्तींचे प्रमाण समजण्यासाठी सिरो सर्व्हे महत्त्वाचा आहे.

उपाययोजनांची दिशा ठरवता येईल
अतिजोखमीच्या व्यक्ती, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, कन्टेन्मेंट झोनमधील नागरिक यांना करोना झाला होता का याची माहिती मिळेल. यासोबतच प्रत्येक वॉर्डतून ठराविक रक्ताचे नुमने घेऊन अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत काय, याची माहिती मिळेल. त्यामधून शहरामध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती तयार झाली आहे काय, याची माहिती मिळेल. त्यानुसार उपाययोजनाची दिशा ठरवता येईल.

“हॉटस्पॉट’ असतानाही सर्व्हे नाही
पुणे, औरंगाबाद या शहरामध्ये सेरो सर्वेक्षण झाले आहे. पुणे शहरामध्ये 51 टक्के, तर औरंगबादमध्ये 12 टक्के नागरिकांच्या शरीरात ऍन्टिबॉडीज तयार झाल्याचे समोर आले आहे. अन्य सहा शहरांमध्ये पहिल्या टप्प्यांत बीड, परभणी, नांदेड, जळगाव व सांगली या जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात सर्वेक्षण सुरू आहे. मात्र पिंपरी-चिंचवड शहर हॉटस्पॉट असतानाही सर्व्हेचा विसर पडला आहे.

सेरो सर्व्हे काय आहे?
विशिष्ट कारणासाठी अनेकांची रक्त तपासणी केली जाते. त्याला सिरोलॉजिकल सर्व्हे असे म्हणतात. या तपासणीद्वारे रक्‍तात काही आजारांचे अँटिबॉडीज तयार झालेल्या आहेत का, याविषयी तपासणी केली जाते. त्या व्यक्‍तीच्या शरीरातील प्रथिनांच्या रचनेचा अभ्यास करून प्रतिकारशक्‍तीचे अनुमान बांधले जाते. यावरून संसर्गाच्या प्रमाणाचाही अंदाज येऊ शकतो.

काय आहेत ऍन्टिबॉडीज?
सद्यस्थितीत 80 टक्‍क्‍यांवर रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे नाहीत. वैद्यकशास्त्रानुसार कोणताही आजार झाल्यानंतर त्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी शरीरात नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक पेशी तयार होतात. त्याला ऍन्टिबॉडीज म्हणतात. अशा अँटीबॉडीज किती व्यक्तींच्या शरीरात तयार झाल्या आहेत ही तपासणी सेरो सर्व्हेमधून करता येते. यामुळे हा सर्व्हे आवश्‍यक आहे.

प्लाझ्मादातेही मिळतील
महापालिका क्षेत्रामध्ये किती जणांच्या शरीरात ऍन्टिबॉडीज आहेत, याची माहिती सेरो सर्व्हेमधून मिळेल. त्याचा फायदा प्लाझ्मा दानासाठी होईल. अशा दात्यांची प्रभागानुसार वेगळी यादी तयार करून गरजू रुग्णांसाठी आवश्‍यकता भासल्यास या दात्यांशी संपर्क करता येऊ शकतो. अत्यावश्‍यक वेळी करोनाग्रस्तांसाठी हे दाते महत्त्वपूर्ण ठरतील.

पिंपरी-चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत हा सिरो सर्व्हे करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच शहरामध्ये सेरो सर्व्हे केला जाईल. त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.