अंबिका उद्योग समूह पोरका; दौंड तालुक्यावर शोककळा
यवत : ग्रामीण भागातील महिलांना झोपडपट्टीमधून मसाला पदार्थ तयार करून बचत गटाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांचे संघटन करून त्यांना जिद्दीने आणि ताठ मानेने जगायला शिकवणाऱ्या दौंड तालुक्यातील खुटबाव येथील अंबिका मसाला केंद्राच्या संस्थापिका अध्यक्ष कमलताई परदेशी यांचे (दि.२) रोजी पुणे येथे निधन झाले.
अंबिका उद्योग समूहासह तालुक्यातील गोरगरीब महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र केलेल्या सर्व कुटुंबाचा आधारवड हरपला असल्याने दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
शेतामध्ये खुरपणी करीत असताना गोरगरीब महिलांना एकत्र करून मसाला उद्योगाच्या माध्यमातून व्यवसायाची उभारणी करत अंबिका महिला उद्योग समूहाची स्थापना केली. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी उद्योगसमूहाचे मसाल्याचे पदार्थ भारताबरोबरच सातासमुद्रापार पोहोचवण्यात त्यांनी यश मिळवले होते.
स्वतः अल्पशिक्षित असताना त्यांनी इतर गोरगरीब महिलांना सोबत घेऊन मसला उद्योगाला मोठे नावलौकिक प्राप्त करून गरजूंना रोजगार मिळवून दिला. याची दखल घेत अनेक सामाजिक संघटनांनी संस्थांनी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले होते. शेतात खुरपणी करणारी महिला ते एक यशस्वी उद्योजिका अशी वाटचाल त्यांनी केली होती. विविध शाळा महाविद्यालयांमध्ये कमलताई यांची व्याख्याने झालेली होती.