पुणे – साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाचे नव्याने उभारला जाणार आहे. त्याचे काम पुढील महिनाभरात हाती घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी कोरेगाव पार्क परिसरातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. मात्र, काम सुरू करण्यापूर्वी प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल केला जाणार असून, येत्या शनिवारपासून हा बदल केला जाणार आहे.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीत या निर्णयावर एकमत झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागकडून सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला असून, सद्यस्थितीत तो कमकुवत झाला आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाइट बॅरिअर टाकून सदरील पूल जड वाहतकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मात्र, आता नवीन पुलाचे काम करण्यात येणार असल्याने ६ जानेवारीपासून पुढील १५ दिवस वाहतूक मार्गांत बदल केला जाणार आहे.
त्यानुसार नगररोड – कोरेगाव पार्क बंडगार्डन कौन्सिल हॉल मोरवाडा या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. काही एकेरी तर काही भाग बंद करण्यात येणार आहेत. तर, या वाहतूक बदलाचा अभ्यास झाल्यानंतर त्याच्या आधारावर अंतिम वाहतूक बदल निश्चित केला जाणार आहे.