पुणे – मंगला टॉकीजशेजारी असलेले भाजपच शहर कार्यालय स्थलांतरीत झाले असून, ते म्हात्रे पुलाजवळील डी.पी. रस्त्यावर सुरू करण्यात आले आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याविषयी माहिती दिली.
या कार्यालयाचे उद्घाटन दि. ७ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यालयात एक मोठे सभागृह, अध्यक्षीय दालन, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने, कॉन्फरन्स रूम, वॉर रूम यांची व्यवस्था केली आहे.
कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष आणि पुरेशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. वर्तमान युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे असल्याने आणि माहितीचे आदान-प्रदान सुलभ व्हावे, प्रभावी जनसंपर्क करता या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे घाटे यांनी सांगितले.
काळाच्या ओघात भाजपाच्या कामाची व्याप्ती सतत वाढत गेल्याने आतापर्यंत असलेले पुणे मनपा जवळील कार्यालय अजून मोठ्या जागेत आणि पार्किंग व्यवस्था मुबलक असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे शहराचे मध्यवर्ती कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरीत करत आहोत, अशी माहिती घाटे यांनी दिली.