* संगणक परिचालकांच्या आंदोनामुळे कामे ठप्प
* ९२ ग्रामपंचयातींच्या फक्त २४ ऑपरेटर कार्यरत
पौड – मुळशीतील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन सुरू असल्याने ग्रामपंचायतीमधील कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये संगणक परिचालक, नागरिकांना ऑनलाइन व ऑफलाइन प्रकारच्या सेवा होतात. मुळशीत ९२ ग्रामपंचयातींच्या कामासाठी फक्त २४ ऑपरेटर कार्यरत आहेत, त्यामुळे मुळशीतील कामाचा ताण संगणक परिचालकांवर येत आहे.
ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन मुळे ग्रामपंचायत मधील विविध नोंदी ,दाखले तसेच इतर कामे होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. संगणक परिचालकांचे सध्या मिळणारे ६ हजार ९३० रुपये हे मानधन तुटपुंजे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सद्यःस्थितीत ग्रामविकास विभागास जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायाच्या आधारे ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतिबंधाची फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्यात यावे, संगणक परिचालकांना सुधारित आकृतिबंधानुसार कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळे पर्यंत २० हजार रुपये मासिक मानधन मिळावे.
नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करावी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देणे व ज्यांची नियुक्ती झाली आहे, त्यांना मागील काही महिन्यापासून मानधन मिळाले नाही त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, आदी विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने शुक्रवार (दि. १७ नोव्हेंबर) पासून राज्यभर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून, याबाबत मुळशी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे.