पुणे – पती आणि वडील या नात्याने पैसे न देणे हे एकप्रकारे आर्थिक शोषण असल्याचे निरीक्षण नोंदवित प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.एम चौहान यांनी पत्नीला दरमहा ६ हजार रुपये आणि मुलाच्या संगोपनासाठी दरमहा 3 हजार रुपये देण्याचा पतीला आदेश दिला.
पतीच्या म्हणण्यानुसार, तो इलेक्ट्रिक टेक्निशियन आहे. त्यामुळे केवळ 13 हजार 500 रुपये कमावतो. त्याने कोणतीही प्रॉपर्टी खरेदी केलेली नाही. जागा किंवा दुकाने ही नातेवाईक आणि चुलत भावांची आहेत. त्यामुळे तो पत्नीला पोटगी देण्यास असक्षम आहे. मात्र तो इलेक्ट्रिक टेक्निशियन असूनही इतके कमी पैसे कमावतो याबद्दल न्यायालयाने साशंकता व्यक्त केली.
राजा आणि राणी (नाव बदललेले) यांचे लग्न २९ जून २०१८ रोजी झाले. त्यांना एक मुलगा आहे. लग्न झाल्यावर नणंदा त्यांच्या संसारात हस्तक्षेप करायच्या. त्या पती आणि सासू-सासऱ्याच्या मनात तिच्याविषयी विष कालवायच्या. कुणीही राणीची काळजी घ्यायचे नाही. ती आजारी पडली तरी तिच्याकडे कुणी लक्ष द्यायचे नाही. उगाचच सासरकडचे तिच्याशी भांडण उकरून काढायचे, असा आरोप करीत तिने कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल केली.
त्यात पतीकडून पोटगी मिळण्यासंबंधीही तिने न्यायालयात अर्ज केला. तिच्या वतीने अॅड. नीता भवर यांनी बाजू मांडली. पतीने आयटी पार्कमधील काम आणि ८० हजार रुपये मिळणारा पगार पत्नीपासून लपवून ठेवला. त्याचे स्वतःचे पाच फ्लॅट असून, ते त्याने भाड्याने दिले आहेत. तिथून आणि दोन दुकानांकडून त्याला भाडे मिळते. ही रक्कम दरमहा दीड ते दोन लाखाच्या घरात जाते, पत्नी ही तिच्या आई वडिलांच्या घरी राहते. तिच्यावर तीन वर्षाच्या मुलाची जबाबदारी आहे. तिला पतीकडून कोणताही आर्थिक पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे दरमहा पत्नीला २० हजार रुपये अंतरिम पोटगी मिळावी अशी मागणी तिच्या वतीने अॅड. नीता भवर यांनी केली.
मात्र पतीने तो इलेक्ट्रिशियन आहे. त्यामुळे केवळ 13 हजार 500 रुपये कमावतो. त्याने कोणतीही प्रॉपर्टी खरेदी केलेली नाही. जागा किंवा दुकाने ही नातेवाईक आणि चुलत भावांची आहेत. त्यामुळे तो पत्नीला पोटगी देण्यास असक्षम असल्याचा दावा न्यायालयात केला. पती इलेक्ट्रिशियन असल्याने तो खासगी काम करणे शक्य आहे. त्यामुळे तो 13 ते 15 हजार रुपये कमावत असेल यावर विश्वास बसत नाही.
तो निश्चितच 20 ते 25 हजार रुपये कमवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर मालमत्तेचा विचार केला तर त्याला किती पैसे मिळत असतील त्या रकमेचा अंदाजही बांधू शकत नाही. हा अॅड. नीता भवर यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने पत्नी व मुलाला पोटगी देण्याचा आदेश दिला.