इंदापूर – कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरने मुख्य बाजार इंदापूर शिवलिलानगर, डाळीब मार्केट, अकलूज रोडलगत इंदापूर येथील अद्यावत मार्केटमध्ये इंदापूर कृषी महोत्सव-2024 अंतर्गत बुधवार, दि. 24 ते 28 जानेवारी दरम्यान पाच दिवसीय कृषी, पशु-पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डॉग शो तसेच पुणे जिल्हातील एकमेव घोडे बाजाराचे दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेले आहे.
कृषी प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असलेची माहिती बाजार समितीचे सभापती विलासराव माने, उपसभापती रोहित मोहोळकर, आमदार यशवंतराव माने व माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली. कृषी प्रदर्शन व घोडे चाल स्पर्धा उद् घाटन 24 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता आमदार यशवंतराव माने यांचे हस्ते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांचे अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तर समारोप, बक्षीस वितरण समारंभ संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते, माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व विधानपरिषद आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत 28 जानेवारी रोजी सकाळी होणार आहे.
इंदापूर कृषी प्रदर्शनास प्रवेश मोफत आहे. तसेच शेतमाल उत्पादनातील अग्रेसर प्रगतशील शेतकरी व नियमित शेतमाल खरेदी-विक्रीचे उत्कृष्ठ व उच्चांकी कामकाज करणार्या व्यापार्यांना प्रोत्साहन देणेकरीता त्यांचा यथोचीत सत्कार केला जाणार आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मनोहर ढुके, संदिप पाटील, रुपालीताई संतोष वाबळे, मंगलताई गणेशकुमार झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे व प्रभारी सचिव संतोष देवकर उपस्थित होते.
काय पाहणार कृषि प्रदर्शनात?
बाजार समितीचे इंदापूर कृषी महोत्सव-2024 अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे-साधने, ऑटो मोबाईल्स, गृहउपयोगी आवश्यक वस्तु तसेच शेती कृषी अनुशंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे कृषी प्रदर्शन 250 स्टॉल, 50 खाद्य स्टॉल, पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजार तसेच घोडे चाल (रवाल), नाचकाम स्पर्धा शिवाय स्मार्ट घोडे नर-मादी, नुकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण आहे.
मनोरंजनाचेही कार्यक्रम
‘डॉग शो’ प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरुष-मुलांसाठी महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम तसेच मुली-महिलांसाठी मोनाली करंदीकर यांचा फुल टु धमाल व खेळ पैठणीचा हा सुप्रसिद्ध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. लहान व प्रोढांसाठी मनोरंजनाचे खेळ व खवय्यांसाठी खाऊगल्ली असे शिस्तबद्ध नियोजन केले जाणार आहे.
तसेच इंदापूर शहर नवीन प्रशासकीय इमारतीपासून विद्यार्थी व नागरिकांसाठी पाच दिवस सकाळी 10 ते रात्रौ 10 पर्यंत मोफत बससेवा सुविधा असे प्रदर्शनाचे नियोजन आहे. तसेच चालू वर्षी नव्याने अश्वरोहणातील ऑलिम्पिक क्रीडाप्रकार प्रात्यक्षिके, महाराष्ट्र लोककला, बुलेट रायडींग असे विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.