पुणे – भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वी भारतीय छात्र संसदेचे दि.१० ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड येथे आयोजन केले आहे. सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून, छात्र संसदेचे हे तेरावे वर्ष आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या सहकार्याने ही छात्र संसद होत आहे. नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन, नॅशनल विमेन्स पार्लमेंट, सरपंच संसद यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार आहे. या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते होइल. जगप्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार प्रा.रामचरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, दि.१२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता या संसदेचा समारोप होणार आहे. प्रेरणादायी व्याखाते डॉ. स्वामी ज्ञानवत्सल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि माजी प्रशासकीय अधिकारी जयप्रकाश नारायण यांची प्रमुख उपस्थिती राहील. छात्र संसदेत ६ सत्रे आयोजित केली आहे. प्रख्यात वक्त्याचे भाषणे होतील. आदर्श युवा विधायक पुरस्कार आणि उच्च शिक्षित आदर्श युवा सरपंच सन्मान होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. रवी. चिटणीस, पं. वसंतराव गाडगीळ, डाॅ, मिलिंद पांडे, डाॅ. सुधाकर माया परिमल, डाॅ. अंजली साने, डाॅ. महेश थोरवे व डॉ. गणेश मंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.