अरुणकुमार मोटे
शिरूर – शिरूर तहसील कार्यालय हे दिवसा नाही तर आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत आहे. आर्थिक मालिदा दिलेल्या अनेक फायलींवर तातडीने सह्या होत असल्याचे जागरूक नागरिकांनी सांगितले आहे. बदलीसाठी गेलेले पैसे वसूल करण्यात अधिकारी गुंग आहे. सामान्य माणूस यात मात्र, नाहक भरडला जात आहे.
रस्ता केसेस, १५५ च्या केसेस फाईलवर लक्ष्मी दर्शन न दिल्याने सह्या होत नाही. त्यामुळे नागरिक तहसील कार्यालयात हेलपाटे मारुन बेजार झाले आहे. दोन दिवसांत रात्रीच्या वेळेस एजंटामार्फत येणाऱ्या लक्ष्मी दर्शनाने फाईलची तातडीने मार्गी लागत आहे. तहसीलदार स्वतःच्या प्रायव्हेट फोर व्हीलर गाडीवर लाल दिवा लावून दिमाखात फिरत आहे.
दक्षिणा न दिलेल्या फाईल अनेक दिवसांपासून तशाच धूळखात पडल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या मनमानी व अपमानास्पद वागणुकीमुळे तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार दिवसा काही वेळा उपस्थित नसतात. मात्र, रात्रीच्या वेळी अचानक हजर होऊन संबधित आस्थापनेच्या कमचार्यांना बोलवून घेत फाईलवर सहया होत आहे.
रात्रीस चांगलाच खेळ चालत असल्याचे एका जागरूक नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. शिरूर तालुक्यातील जनतेचे कामावाचून प्रचंड हाल होत असून आगामी काळात याविरोधात मोठे आंदोलन छेडणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.