पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये व संलग्न महाविद्यालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2024 पासून वाढीव मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. आता विद्यार्थ्यांना 45 रुपये प्रतितास ऐवजी 55 रुपये प्रतितास एवढे मानधन मिळणार आहे.
याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाने काढले. विद्यापीठाच्या आधिसभा सदस्यांनी तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी वेळावेळी केली होती. तसेच विद्यापीठाच्या आधिसभेमध्ये सुद्धा काही सदस्यांनी या संदर्भातील ठराव व प्रस्ताव सादर केले होते. त्यावर सुमारे तीन महिन्यांपूर्वी व्यवस्थापन परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मानधन वाढीचा निर्णय केव्हा लागू होणार, असा प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर 1 जानेवारीपासून मानधन वाढीचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठ प्रशासनाने कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचा उद्देश समोर ठेवून काही कामे दिली आहेत. परंतु, आता त्यात सुधारणा केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्ठित कामे दिली जातील, अशी माहिती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डाॅ. देविदास वायदंडे यांनी दिली.