पुणे – फर्गसन महाविद्यालय रस्ता म्हणजेच नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील दोन महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आणि दुसर श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर होय. या दोन्ही ठिकाणी माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे दुपारचे विसावा ठिकाण होते. संत तुकाराम महाराज पादुका चौक येथे पालखी विसाव्याचा चौथरा होता. याच ठिकाणी स्व. आनंदीबाई राजाराम शिरोळे पाटील यांनी 1830 मध्ये श्री जंगली महाराजांच्या आदेशानुसार तुकोबारायांच्या पादुका स्थापन केल्या.
हा परिसर पूर्ण गर्द झाडींनी व्यापलेला होता. जवळच दोन-तीन विहिरी असल्याने पाण्याची मुबलकता होती. त्यामुळे सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी पाणी आणि मोकळी जागा मिळत असल्याने त्यांना येथे विसावा करणे सोयीचे होत होते. पूर्वी येथे फक्त चौथऱ्यावर पादुका होत्या. सध्याच्या मंदिरातील मूर्ती साधारण अडीच-तीन फुटांच्या सुबक आहेत. याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांची मूर्ती असून, पुढे त्यांच्या पादुका आहेत. 1978 मध्ये हभप निंबराज महाराज जाधव आणि प्रतापराव आबुराव शिरोळे यांनी ट्रस्ट स्थापन केला.
त्यानंतर 1988 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. हभप निंबराज जाधव महाराज यांच्या संकल्पनेतून हे तीन मजली मंदिर बांधण्यात आले. यामध्ये तळमजल्यावर ग्रंथालय, मधल्या मजल्यावर देवालय आणि वरच्या मजल्यावर वारकरी कीर्तन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. यावेळी पहिले अध्यक्ष म्हणून प्रतापराव शिरोळे यांची नियुक्ती करण्यात आली.
पुण्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आल्या की या ठिकाणी आता आरती होते. पूर्वी पालख्या दुपारच्या वेळी येत असत, त्यामुळे हे विसाव्याचे ठिकाण होते. मात्र आता पालख्या सायंकाळी येत असल्याने येथे आरती होते. यावेळी तुकोबांच्या पादुका पालखीतून काढल्या जातात. मंदिरात नेतात आणि तेथील पादुकांची या पादुकांशी भेट होते. यानंतर आरती झाली, की पालख्या पुण्यातील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ होतात.
या मंदिराचे ट्रस्ट झाल्यानंतर विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. यामध्ये तुकाराम बिजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. मंदिराच्या अमृत महोत्सवावेळी गाथाग्रंथाची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी असलेला हत्ती मिरवणुकीचे भूषण ठरला होता. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या महान व्यक्तींची व्याख्याने यावेळी येथे झाली. सध्या या मंदिराचे अध्यक्ष रमेश प्रतापराव शिरोळे आहेत आणि हभप निंबराज महाराज जाधव, हभप नारायण बा. बांद्रे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जय जोशी विश्वस्त आणि किसन गजमल हे सचिव आहेत.
ग्रंथालय, देवालय, विद्यालय
हे मंदिर म्हणजे हभप निंबराज महाराज जाधव यांची कर्मभूमी आहे. अध्यात्म जीवनाचा अंगीकार केलेल्या महाराजांचे या मंदिर घडणीत मोठे योगदान आहे. या मंदिराच्या तळाशी असलेले ग्रंथालय, मधले देवालय आणि वर कीर्तन विद्यालय हे विद्येचे माहेर घर असलेल्या पुणे शहराचे वैभव ठरले आहे.
हभप निंबराज महाराज जाधव
वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व. आजपर्यंत संप्रदायाशी निगडित 75 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वयाच्या 80 नंतरही सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग असलेल्या महाराजांचे येथील ग्रंथालयाच्या आणि कीर्तक विद्यालयाच्या कामकाजावर बारीक लक्ष असते. या विद्यालयाच्या माध्यमातून सरकारमान्य विद्यालयाच्या परीक्षेस येथील छात्रांना बसवले जाते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आज शेकडो मान्यवर कीर्तनकार येथे तयार झाले आहेत.
21 हजार पुस्तकांचे ग्रंथालय
या मंदिराच्या तळघरात असलेल्या श्री संत तुकाराम महाराज ग्रंथालयाची स्थापना 1978 मध्ये हभप निंबमहाराज आणि प्रतापराव शिरोळे यांनी केली. या ग्रंथालयाला सरकारमान्य “ब’ दर्जा असून, येथे सुमारे 21 हजार संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. यामध्ये वेद, उपनिषदे, आणि संत चरित्र आणि वाङ्मयाचा समावेश आहे. पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचा “आदर्श ग्रंथालय’ पुरस्कार या ग्रंथालयाला मिळाला असून, देवालय ते ग्रंथालय आणि विद्यालय असे या मंदिराचे कार्य सध्या सुरू आहे. या ग्रथालयाची माहिती ग्रंथपाल भूषण खरबडे यांनी दिली.