हिरव्या, पिवळ्या तसेच काळ्या माव्याचाही झाला प्रादुर्भाव : शेतकरी चिंताग्रस्त
सोरतापवाडी – सोरतापवाडी व परिसरात गुलछडी उत्पादक करप्या, मावा व खोडकुजीने हैराण झाले आहेत. गुलछडी वर हिरव्या, पिवळ्या तसेच काळ्या माव्याचा प्रादूर्भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामध्ये खोडकुज होऊन गुलछडीची शेती नष्ट होऊ लागली आहे.
गुलछडी पिकात खोडामध्ये लोकरी मावा पडत असून, मुळे कुजून गुडघ्यापर्यंत आलेली गुलछडी खराब झाली आहे. कितीही औषध फवारणी केली तरी मावा, अळी, तुडतुडे तसेच सर्वच प्रकारच्या किडी आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. नायगाव, पेठ, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी व शिंदवणे, वळती अशा अनेक गावातील शेतकऱ्यांना चिंता लागली असून औषधफवारणीच्या वाढीव खर्चाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सणासुदीच्या दिवसांत गुलछडीला पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गौरी गणपतीमध्ये गुलछडी 500 ते 600 रुपये किलो होती पण या रोगामुळे 50 ते 60 टक्के माल खराब होत होता.
आता दसरा व दिवाळीच्या तोंडावर गुलछडीला पडलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांच्यात नाराजी दिसत असून शेतकरी औषधे फवारणी करून रोग आटोक्यात आणत आहे. रोग आटोक्यात आला तर शेतकऱ्यांना नक्कीच दसरा दिवाळीत माल जास्त निघून आर्थिक फायदा होईल.