पुणे : जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एका दिवसात 4 हजार 552 नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.
राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
त्यानुसार बुधवार, 11 मे रोजी आयोजित फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून सदर फेरफार अदालतीमध्ये साध्या 3 हजार 684 , वारस 676 आणि तक्रारी 192 अशा एकूण 4 हजार 552 फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.
बारामती तालुक्यात सर्वाधिक फेरफार नोंदी निर्गत
बारामती तालुक्यात सर्वाधिक 665 तर दौंड तालुक्यात 597 नोंदी निर्गत करण्यात आल्या. हवेली तालुक्यात 368, पुणे शहर 9, पिंपरी चिंचवड 148, शिरुर 591, आंबेगाव 427, जुन्नर 281, इंदापूर 215, मावळ 245, मुळशी 85, भोर 123, वेल्हा 111, पुरंदर 218 आणि खेड तालुक्यात 469 फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले.