“वसुंधरेच्या ऋणात’ पुस्तक नव्या पिढीसाठी वरदान ठरणार : आंबेजोगाईत प्रकाशन
इंदापूर – मानवी जीवन जगत असताना, जसे आपण आपल्या बाळाला लहानाचे मोठे करतो. लक्ष ठेवतो, प्रेम लावतो असाच लळा वृक्षारोपण करून आपल्या बाळाप्रमाणे परिसरातील, दारातील, व गावातील झाडाला महत्त्व द्या. झाडाचे संवर्धन करा असे आवाहन इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.
गणपत व्यास लिखित, वसुंधरेच्या ऋणात या पुस्तकाचे प्रकाशन अंकिता शहा, तसेच नारायणदास रामदास ट्रस्ट शहा नर्सरीचे सर्वेसर्वा मुकुंद शहा यांच्या हस्ते नागपूरकर सभागृह योगेश्वरी महाविद्यालय आंबेजोगाई येथे पार पडले. यावेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेजोगाई नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, किरण कुलकर्णी, कार्यक्रमाचे आयोजक विजयालक्ष्मी व्यास, प्रशांत व्यास, मंजिरी व्यास यांच्यासह साहित्य कला सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंकिता शहा म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकाने वसुंधरेच्या ऋणात राहिलेच पाहिजे, यासाठी प्रत्येक घरी आपण जे सण साजरे करतो. वाढदिवस साजरे करतो. सुखाच्या आणि दुःखाच्या स्मृती कायम आपल्या येणाऱ्या पिढीला आठवण्यासाठी, दिसण्यासाठी वृक्षारोपण करण्याची जबाबदारी वृक्ष जोपासण्याची प्रत्येक कुटुंबांनी उचलली तर वसुंधरेचे यशस्वी संगोपन संवर्धन केले जाईल. वसुंधरेच्या ऋणात या पुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदर्श मिळेल.
आम्ही तर पुणे जिल्ह्यात राहतो; परंतु बीड जिल्ह्यात वसुंधरेच्या ऋणात या पुस्तकाच्या प्रकाशनाची संधी केवळ शहा नर्सरी येथून अनेक जिल्ह्यात, राज्यभर मोफत पुरवण्यात येणारी झाडे, वृक्ष, मोफत दिलेले वृक्ष जगवण्याचे हमीपत्र या कार्यामुळे लेखक गणपत व्यास यांच्यामुळे मिळाली.ज्या ज्या वेळेस अंबेजोगाई तालुक्यातील परिसरात वृक्ष लागवड करायची असेल तेव्हा शहा नर्सरी आपल्या तालुक्याला विसरणार नाही.
-मुकुंद शहा, नारायणदास रामदास ट्रस्टचे प्रमुख