पुणे ग्रामीण पोलिसांना गुन्हेगारी थोपवण्याचे आव्हान
खडकवासला – तरुण किशोरवयीन मुलांच्या टोळ्या तयार करून वाम मार्गाला लावून गुन्हेगारी करण्याचे फॅड सध्या पुणे ग्रामीण भागात जोरात सुरू झाले आहे. अल्पवयीनच्या नावाखाली असेच गुन्हेगार सुटत राहिले तर अट्टल गुन्हेगार लहान मुलांचा गैर फायदा घेऊन समाजात दहशत पसरवत राहतील; कायद्यामध्ये सुधार गरजेचा आहे. शिक्षा नाही झाली तर अशा लोकांची हिंमत अजून वाढेल.
अल्पवयीन मुलांसाठी असलेल्या सौम्य कायद्याचा डोकेबाजपणे गैरवापर करून काही महाभागाने गुन्हेगारीचे बेमालूम जाळे विणले आहे. या प्रवृत्तीमुळे सामाजिक शांतता बिघडत असल्याने अशा अल्पवयीन गुन्हेगारांच्या मुलांच्या टोळ्या ग्रामीण भागातील जटील समस्या बनत आहे. सध्या ग्रामीण भागातील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन व तरुणांमध्ये दाढी-मिशा, केस वाढवणे त्यानंतर अनेक मुलांची टोळी तयार करून परिसरात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणे.
यांची केस वाढत चालल्याने याचाच गैरफायदा घेत काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे गुन्हेगार व स्वयंघोषित युवा नेते काही तथाकथित राजकीय नेते व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून या मुलांना संघटित करून यांचा वापर गुन्हेगारीसाठी करत आहेत. वादाच्या जमिनीचे ताबे बळजबरीने घेणे, हप्ता वसूल करणे, दारू धंद्यावरून खंडणी वसूल करणे एवढेच नव्हे तर या मुलांना अवैध धंदे टाकून देऊन वाममार्गाला लावणे असे प्रकारही सुरू आहेत.
हळूहळू ही तरुणाई गुन्हेगारीचे अनुकरण करून गंभीर गुन्हे करण्यास सुरुवात करतात. या अल्पवयीन मुलांकडून खून हाणामारी लूटमार हल्ले, असे प्रकार हवेली तालुक्यात वाढू लागले आहेत. अल्पवयीन मुलांचे ग्रुप प्रमुख मात्र त्यांच्या जीवावर पैसे कमवू लागले. स्वतःच्या वाढदिवसाला लाखो रुपयांची उधळपट्टी करू लागले आहेत. तरुणाई मागे असल्याने स्थानिक राजकीय नेते त्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावत आहे. ग्रामीण पोलीसही याकडे दुर्लक्ष करू लागल्याने तरुणाईचे मनोबल वाढत चाललेले आहे.
हवेली ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी
सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडलेल्या गुन्ह्यांची 24 तासाच्या आत उकल करण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या भावाच्या हत्येचा बदला म्हणून तीन अल्पवयीन आरोपींनी राहुल चंद्रकांत आटोळे (वय 36) याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकाचे वय 17 वर्षे 11 महिने आणि 28 दिवस!
तीनही आरोपी अल्पवयीन असले तरी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यातील एका आरोपीचे वय तर 17 वर्ष 11 महिने आणि 28 दिवस आहे, म्हणजेच गुन्हा करण्याच्या दिवशी तो केवळ दोन दिवसांनी अल्पवयीन होता. अत्यंत निर्घृणपणे खून करुनही अल्पवयीन असल्याने कायद्याचा आधार घेऊन सुटता येईल, याची पूर्ण जाणीव या आरोपींना असल्याचे दिसून येत आहे. आरोपींनी खून केल्यानंतर कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यामुळे तपासाचे मोठे आव्हान होते. तरीही हवेली पोलिसांनी 3 पैकी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे.