पुणे : पालखी सोहळ्यामुळे पीएमपी बस पार्किंसाठी जागा उपलब्ध नसल्याने पीएमपी बस पूलगेट आगाराऐवजी सारसबाग परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र, बसमध्ये चावी असल्याचे पाहून चोरट्याने चक्क बस पळवून नेली. यानंतर मार्केट यार्ड परिसरात बस सोडून चोरटा पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
चोरट्याने बसमधील पाच हजारांची बॅटरी चोरून नेली असून या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीएमपीच्या स्वारगेट आगारातील सुरक्षा अधिकारी सुरेश सोनवणे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपीच्या स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बसफेरी पूर्ण केल्यानंतर चालक बस लष्कर भागातील पूलगेट स्थानकात लावतात.
काही बस स्वारगेट भागात लावण्यात येतात. पीएमपी बस लावण्यास जागा अपुरी पडत असल्याने बस वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येतात. पालखी सोहळ्यामुळे लष्कर भागातील पूलगेट स्थानकात बस लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने एका चालकाने रात्री बस सारसबाग परिसरातील सणस मैदान परिसरात लावली होती. चावी बसमध्ये होती.
दरम्यान, बस चोरीस गेल्याचे बुधवारी (14 जून) लक्षात आल्यानंतर शोध घेण्यात आला. तेव्हा बस मार्केट यार्ड आगाराजवळ लावण्यात आल्याचे आढळून आले. चोरट्यांनी या भागातील दोन बसच्या काचाही फोडल्याचे आढळून आले आहे. पीएमपीतील सुरक्षा अधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी सिताप तपास करत आहेत.